न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२२) :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व गणेशोत्सव एकाच वेळी आला आहे. दोन वर्षे आपण घरात बसलो आहोत. पण यंदाचा उत्सव आनंदात, जल्लोषात साजरा करायला हवा, असे मत पिंपरी-चिंचवडच्या माजी महापौर माई ढोरे यांनी व्यक्त केले. गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते, असेही त्या म्हणाल्या.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे पिंपरी-चिंचवडसाठी आयोजित गणेशोत्सव स्पर्धा २०१९ चे प्रथम पारितोषिक वितरण आचार्य अत्रे रंगमंदिरात पार पडले, तेव्हा त्या बोलत होत्या. यावेळी भोसरीतील समस्त गव्हाणे तालीम मंडळांस प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.
यावेळी माजी महापौर मंगला कदम, माजी उपमहापौर कैलास भांबुर्डेकर, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, प्रसाद शेट्टी, महादू गव्हाणे, बाळासाहेब गव्हाणे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, अक्षय गोडसे, अमोल केदारी आदी उपस्थित होते.
पोलीस उपयुक्त मंचक इप्पर म्हणाले, उत्सवी काळात पोलिसांची गरज पडू नये, याकरता काळजी व संयम गरजेचा आहे. आपल्या आनंदाचा इतरांना त्रास होता कामा नये, याची खबरदारी घ्यावी.
प्रास्तविक महेश सूर्यवंशी यांनी केले. संतोष ढोरे यांनी सूत्रसंचालन केले.