न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२२) :- मुंबई-बंगळूर महामार्गावरील खड्डे चुकवताना वाहनावरील ताबा सुटून संतुलन बिघडल्याने डंपर पलटी झाला. यामुळे काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ही घटना सोमवारी (दि. १९) दुपारी दीडच्या सुमारास वाकड येथील मुळा नदीच्या अलिकडे घडली. यात सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.
क्रशसॅन्ड घेऊन दुपारी एम १४, डीएम २९६१ क्रमांकाचा डंपर वाकडहुन सातारच्या दिशेला जात होता. तेव्हा रस्त्यातील खड्डे चुकविण्यासाठी वाहन चालकाने अर्जंट ब्रेक दाबून लेन बदलण्याचा प्रयत्न केल्याने वाहनावरील नियंत्रण बिघडल्याने तो रस्त्यात पलटी झाला.
त्यामुळे भूमकर चौक ते वाकड चौकादरम्यान वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. मात्र घटनास्थळी दाखल झालेल्या वाहतूक पोलिसांनी वाहतूकीचे नियमन केले. दोन क्रेनला पाचारण करून क्रेनच्या सहायाने डंपर सरळ करण्यात आला.