- ग्रामीण भारत ‘जुगाड’ करण्यात अग्रेसर…..डॉ. व्ही.के. सारस्वत
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रु.) :- शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये राहणा-या नागरिकांना अधिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातही शेतक-यांना अडचणी अधिक असतात. ते आपल्या परीने या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच ग्रामीण भागामध्ये ‘जुगाड’ करुन नवीन तंत्रज्ञान विकास होत असल्याचे पहायला मिळते, असे प्रतिपादन निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत यांनी रविवारी (दि. २४) आकुर्डी येथे केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) आणि केपीआयटी कंपनीच्या संयुक्त विद्यमाने ‘केपीआयटी स्पार्कल २०१९’ या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (दि. २४) झाला. यावेळी सीएसआयआरचे संचालक डॉ. शेखर मांडे, एआयसीटीचे चेअरमन अनिल सहस्त्रबुध्दे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, केपीआयटीचे चेअरमन रवी पंडित, अनुप साबळे, अटल इनोव्हेशन मिशनचे उन्मत पंडित, पीसीईटीचे सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. ए.एम. फुलंबरकर, समन्वयक प्रा. राहुल पाटील, डॉ. शितलकुमार रवंदळे आदी उपस्थित होते.
सारस्वत पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार विज्ञान, तंत्रज्ञान अधिक वेगाने विकसित व्हावे यासाठी ‘अटल इनोव्हेशन’ योजना सुरु केली आहे. त्याव्दारे स्मार्ट स्टार्टअप व पर्यावरण पुरक संशोधनास प्रोत्साहन दिले जात आहे. स्पार्कल स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले नाविन्यपुर्ण संशोधन प्रकल्प उत्कृष्ठ आहेत. विद्यार्थ्यांनी सामान्यांना येणा-या अडचणींचा विचार करुन प्रकल्प सादर केले. पर्यावरणातील बदलांमुळे मानवी जीवनावर परिणाम होत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करताना पर्यावरणपूरक उत्पादनांवर भर दिला पाहिजे. इंजिनची कार्यक्षमता आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी वाहनांना पर्यायी इंधन म्हणून इथेनॉल – मिथेनॉलचा वापर वाढला पाहिजे. वाहनांच्या बॅटरीसाठी लिथीयमचा वापर केला जातो. पण लिथीयमच्या वापरावर मर्यादा आहेत. त्याऐवजी सोडियम आयर्नचा वापर अधिक उपयोगी ठरु शकतो.

डॉ. शेखर मांडे म्हणाले की, संपूर्ण जगाला ‘ग्लोबल वॉर्मिंग’ चा फटका बसत आहे. पर्यावरण रक्षणासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करुन, नवीन संशोधनाने परिणामांची तीव्रता कमी करता येऊ शकते. त्यासाठी अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढला पाहिजे. शासनाने सुरु केलेल्या स्टार्टअपच्या माध्यमातून या गंभीर प्रश्नांवर तरुण संशोधक पर्याय शोधू शकतील असा विश्वास डॉ. मांडे यांनी व्यक्त केला.
डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे म्हणाले, २०१७ पासून सरकारने स्मार्ट प्रशिक्षण संस्था उभारण्यावर भर दिला आहे. त्यामुळे विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये तरुण संशोधकांची संख्या वाढत आहे. शासनाच्या विविध विभागांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने तरुण संशोधकांची मदत घेण्यात आली. सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करीत अनेक अडचणींवर मार्ग शोधला. या संशोधनाचा सरकारी विभागांना खूप मोठा फायदा झाला. विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती जोपासत चूकांमधून शिकत पुढे जावे, असे डॉ. सहस्त्रबुध्दे यांनी सांगितले.
डॉ. माशेलकर म्हणाले की, संशोधनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवन अधिक समृध्द, सुखकर कसे होईल याचा विचार संशोधकांनी केला पाहिजे. तंत्रज्ञान त्याची उपयोगिता आणि वापर यावर आपल्या संशोधनाचे महत्व अवलंबून असते. ज्या तरुण संशोधकांना स्पर्धेत बक्षिस मिळाले नाही त्यांनी निराश होऊ नये. प्रयत्न करत रहावे. प्रयत्नांना यश मिळतेच. यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही. कष्टातून मिळालेले यश अनंत काळ टिकते असे डॉ. माशेलकर यांनी सांगितले.
प्रास्ताविकात रवी पंडीत म्हणाले की, ‘केपीआयटी स्पार्कल’ चे हे पाचवे वर्ष आहे. यावेळी ‘एनर्जी आणि मोबिलीटी’ या विषयावर देशभरातून २२ हजार प्रकल्पांची नोंदणी स्पर्धकांनी केली. त्यातून ३० प्रकल्पांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. देशातील सामाजिक सुविधा, प्रश्न यांचा विचार करुन वाहन, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये सुधारणा करण्याचा उद्दिष्ठाने केपीआयटी काम करत असून नवसंशोधकांना प्रोत्साहन देत आहे.
यावेळी आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे (टीम ॲक्वा – १० लाख रुपये), भारत इन्स्टिट्युट ऑफ हायर एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, चेन्नई (टीम ग्रॅव्हीटी – अडीच लाख रुपये) आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, इंदौर (टीम ऑटो ट्रेक यांना अडीच लाख रुपये) आणि जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे (टीम ड्राईव्हट्रेन यांना एक लाख रुपये) देऊन गौरविण्यात आले.
सुत्रसंचालन अमृता जोशी, आभार प्राचार्य डॉ. ए.एम. फुलंबरकर यांनी मानले. कार्यक्रमास विविध विद्याशाखांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, स्पर्धक संघ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











