न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रु.) :- पिंपरी कॅम्प ही पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य बाजारपेठ असून, औद्योगिक सुट्टीनिमित्त गुरुवारी आणि रविवारी या बाजारपेठेत मोठी उलाढाल होते. मात्र, दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे शगुन चौक, साई चौक व परिसरात चालणे देखील मुश्किल होत आहे.
याठिकाणी खरेदीसाठी येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यातच रिक्षा व्यावसायिकांचीही भर पडते. एकेरी वाहतूक, सम-विषम पार्किंग अशा अनेक उपाययोजना करुनही, याठिकाणी वाहतूक कोंडी कायम आहे. एकिकडे वाहतूक आणि दुसरीकडे फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. रस्ता ओलांडताना कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.

याची दखल घेत भाजपा नगरसेवक शैलेश मोरे यांनी वाहतूक विभाग व मनपा अधिकाऱ्यांसोबत प्रभाग क्र. १९ मधील पिंपरी कॅम्पमधील परिसराला भेटी दिल्या व येथील अतिक्रमणाची पाहणी केली. यावेळी पिंपरी बाजारपेठेतील रस्त्यावर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले असल्याचे त्यांना आढळून आले. दुकानांसमोरच दुचाकी पार्किंगसाठी राखीव जागेवर कपड्यांचे रॅक लावून ठेवलेले तसेच एका व्यापाऱ्याने रस्त्यावरच चप्पल विक्रीचा लावलेला स्टॉल, दुकानासमोरच हातगाड्या लावल्या जातात. दुकानदारांनी त्यांचे साहित्य रचून ठेवल्याने नागरिकांना ये-जा करताना होणारी कसरत आदी बाबींची नगरसेवक शैलेश मोरे व अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
यावेळी सबंधित स्थानिक व्यापाऱ्यांशी नगरसेवक शैलेश मोरे व वाहतूक तसेच मनपा अधिकाऱ्यांनी चर्चा केली. तसेच या अतिक्रमणामुळे वाहतुक कोंडी होते. त्याचा नागरिकांना त्रास होतो. या गोष्टी व्यापाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच नगरसेवक शैलेश मोरे यांनी वाहतूक कोंडी व व्यापाऱ्यांच्या अडचणी यावर तोडगा काढून, उपाय शोधावा, तशा सूचना संबंधित वाहतूक तसेच मनपा अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
यावेळी पिंपरी कॅम्पातील दुकानदार, व्यापारी, मनपा तसेच वाहतुक अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.











