न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रु.) :- यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील पदव्युत्तर संस्थेचे विशेष कार्य अधिकारी यांना राज्य शासनाच्या सेवेत परत पाठवावे, याकरीता महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले असून, त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती येथे स्वतंत्रपणे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम (post graduate institute) सुरू करण्यास भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने मान्यता दिली आहे.
सदर वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी मनपाने शासनाकडे सहा महिन्याकरीता अधिष्ठाताची मागणी केली होती. त्या अनुषंगाने नगरविकास विभागाने १ वर्षासाठी डॉ पद्माकर पंडित प्राध्यापक औषधशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात विशेष कार्य अधिकारी या पदावर प्रतिनियुक्तिने नियुक्ती करण्यात आलेली आहे. एक वर्ष मुदत संपल्यानंतर नगर विकास विभागाने अजून एक वर्षासाठी प्रतिनियुक्ती करण्यात आलेली आहे. या एक वर्ष मुदतीचे मा. महापालिकेची मान्यता घेण्यात आलेली नाही. सदर प्रतिनियुक्ती कालावधी दिनांक १७/०२/२०१९ रोजी संपुष्टात आलेली आहे. तरीसुद्धा डॉ पद्माकर पंडित कार्यरत आहेत. त्यामुळे नियुक्ती नियमबाह्य आहे.
गेली दोन वर्षांपासून डॉ. पद्माकर पंडित मनपाकडे विशेष कार्य अधिकारी पदावर नियुक्त असूनही, अद्यापही सदरचा अभ्यासक्रम सुरू झालेला नाही. त्यातच या अभ्यासक्रमासाठी विविध संवर्गातील पदे मानधनावर भरण्यात आलेली आहे. ही मानधनावरील पदे नियमबाह्य पद्धतीने कुठल्याही प्रकारची जाहिरात न नियमित वेतनश्रेणीमध्ये भरण्यासाठी माहे फेब्रुवारीच्या मा. महापालिका सभेपुढे उपसूचनेद्वारे प्रयत्न करण्यात आला. परंतु, तो सफल झाला नाही. यामध्ये आर्थिक घोटाळा झालेला आहे. त्यामुळे अशा क्रियाशून्य बेजबाबदार, भ्रष्टाचारी विशेष कार्य अधिकाऱ्यांची मनपास गरज नाही. तसेच वयाच्या अर्हतेमध्ये बसत नाही. त्यामुळे त्यांना तात्काळ राज्य शासनाच्या सेवेमध्ये परत पाठविण्यात यावे व शासनाकडे या अभ्यासक्रमासाठी नवीन हुशार अनुभवी ज्येष्ठ अधिकाऱ्यांची मागणी करण्यात यावी किंवा मनपातील पात्र जेष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे या पत्रात साने यांनी म्हटले आहे.











