न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रु.) :- इंडिपेंडेन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या (आयईएसए) वतीने प्रलंबित विविध मागण्यासाठी सोमवारी (दि. २५) खासगी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
या बंदमध्ये असोसिएशनशी निगडित ११९ शाळांपैकी ७८ शाळांनी बंद पाळला. आयईएसएने असोसिएशन पार्टनर नॅशनल इंडिपेंडेन्ट स्कूल अलायन्सच्या माध्यमातून विविध मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्यासाठी हा बंद आयोजित केला होता, असे स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र सिंग यांनी सांगितले आहे.
सिंग म्हणाले, आमच्या मागण्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शाळांच्या असून अनेक दिवसांपासून त्या प्रलंबित आहेत. त्या पुढीलप्रमाणे :-
- असोसिएशनने नोव्हेंबर मध्ये नमूद केल्याप्रमाणे शाळांचे निरीक्षण व कठोर प्रक्रिया मागे घ्यावी. २०१२ ते २०१९ पर्यंत आरटीई २५ टक्के प्रवेशाची थकीत फी परतावा तातडीने द्यावा.
- राज्यातील सर्व शाळांसाठी “शाळा संरक्षण कायदा’ करावा.
- स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर दर्जा वाढ प्रस्तावासाठी ऑनलाईन प्रक्रिया तातडीने सुरु करावी.
- शालेय विद्यार्थी वाहतूकसंदर्भात मुख्याध्यापकांऐवजी शाळेने नियुक्त केलेल्या वाहतूक व्यवस्थापकांवर जबाबदारी सोपवण्यात यावी.
- पाल्यांच्या शुल्काची पूर्तता न करणाऱ्या पालकांवर शाळेने कोणती कारवाई केली पाहिजे त्याची नियमावली लागू करावी.
- सरकारने आरटीई अंतर्गत मोफत पुस्तके, पिशवी, गणवेश आणि इतर सामग्री उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी घ्यावी.











