- प्रभाग दहामध्ये ठेकेदाराच्या सांगण्यावरून २५ झाडांची कत्तल..
- भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी वृक्षतोडीची घटना आणली उघडकीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२२) :- प्रभाग क्रमांक दहा दत्तनगर, विद्यानगर, शंकरनगर या स्लम भागात २० ते २५ वृक्षांची अत्यंत निर्दयीपणे कत्तल केल्याची घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी उघडकीस आणली. तेथील मजुरांना जाब विचारला असता पालिकेतील अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांच्या सांगण्यावरून हा प्रकार केल्याचे मजुरांनी गोरखे यांना सांगितले.
याबाबत माहिती देताना अमित गोरखे म्हणाले, महापालिकेच्या ठेकेदाराच्या माणसांनी २० ते २५ मोठ्या झाडांची निर्घृणपणे मुळासकट कत्तल केली. ही एक प्रकारची मोठी हत्याच आहे. एवढी झाडे एकदम तोडणे म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास करण्यासारखे आहे. हा झोपडपट्टीचा भाग असल्यामुळे याला कोणी वाली नाही? या प्रभागातील माजी नगरसेविका अनुराधा गोरखे या माझ्या आई आहेत. त्यांना तसेच इतर तीन नगरसेवकांना या वृक्ष तोडीबद्दल माहिती देण्यात आली नव्हती. संबधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावे व ज्या अधिकाऱ्याने वृक्षतोडीचे आदेश दिलेत, त्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे, अशी माहिती अमित गोरखे यांनी दिली.
पिंपरी चिंचवडमध्ये वुड माफिया आहे. तो कुणालाही जुमानत नाही, हे आम्ही पर्यावरण क्षेत्रात कार्यरत लोकांनी वारंवार सांगितले. त्याचाच हा आजचा एक कटु अनुभव आहे. आयुक्तांनी ह्याची गंभीर दखल घेऊन त्वरित कडक कारवाई करावी, अशी मागणी आम्ही सर्व संस्था करीत आहोत. – धनंजय शेडबाळे – स्मार्ट सिटी, एनजीओ सदस्य…


















