न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २८ फेब्रु.) :- औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिवस’ साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी साहित्यिक कवी, कथाकार बबन पोतदार आणि ज्येष्ठ कवयत्री जयश्री घुले उपस्थित होत्या.
मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भीत्तीकापत्रीकेचे उदघाटन बबन पोतदार आणि जेष्ठ कवयत्री जयश्री घुले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, प्रा.मयूर माळी, प्रा.वाघ सर, प्रा.कांबळे सर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बबन पोतदार म्हणाले की, मराठी भाषा ही प्रवाही स्वरूपाची भाषा असून, प्राचीन काळापासून आजपर्यंत तिने आपले अस्तित्व टिकऊन ठेवलेले आहे. त्यांनी भाषेच्या उगमाविषयी आणि आजपर्यंत तिचा झालेला विकास यावर भाष्य केले. तसेच कविता, कथा कशी जन्माला येते. यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. कथेमधूण समाजप्रबोधन कसे केले जाते याचे सविस्तर मार्गदर्शन केले.
ज्येष्ठ कवयत्री जयश्री घुले यांनी आपल्या गोड आवाजामधून कवितांचे गायन करून, विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. आपल्याला कविता कुठे आणि कशी भेटली. यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देऊन, मराठी ही आपली मातृभाषा असल्याने, तिचे संवर्धन करणे हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मराठी भाषेवर सातत्याने इतर भाषांची आक्रमणे झाली आहेत. परंतु तरीसुद्धा तिने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. इतर भाषेतील शब्द आत्मसात करून ते अधिकाधिक समृद्ध झालेली दिसते. आजपर्यंत मराठी भाषेने उर्दू, हिंदी, अरबी, फारसी, इंग्रजी भाषेतील शब्द आत्मसात करून ती अधिकाधिक समृद्ध आणि प्रवाही झालेले दिसते. त्यामुळे जागतिकीकरणाच्या युगातसुद्धा मराठी भाषा इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, चायनीज, रशियन भाषेतील शब्द घेऊन अधिकाधिक समृद्ध होईल, असे मत प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी मराठी भाषा काल-आज आणि उद्या कशी असेल यासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये सुदेश भालेराव, कु. प्रज्ञा शिंदे, चंद्रकांत सोनवणे, कु. मोहिनी खवळे या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय नगरकर, डॉ. अतुल चौरे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र जाधव याने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख डॉ. अतुल चौरे यांनी तर आभार प्रियदर्शनी पारकर यांनी केले.











