न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत जाहिरात फलक काढण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्था फलकाचे साहित्य भंगारात विक्री करणार असून त्यातील ९९ टक्के हिस्सा महापालिकेला देणार आहेत. एक वर्षांसाठी हे काम देण्यात आले आहे.
महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील वेगवेगळ्या आकाराचे अनधिकृत जाहिरात फलक स्ट्रक्चरसह स्वःखर्चाने काढून निघालेल्या स्क्रॅपचे एकूण वजनानुसार मंजूर दराने येणाऱ्या किंमतीमधून किती रक्कम पालिकेला देणार याकरिता एजन्सी नेमण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. त्यासाठी ४ निविदा प्राप्त झाल्या. समितीने मान्यता दिली. त्यापैकी अरबाज इंजिनिअरिंग अँड सिव्हील कन्स्ट्रक्शन यांनी निविदा अंदाजपत्रकीय दरावर ९९ टक्केवारी दर दिला आहे. उर्वरित ३ निविदाधारकांपैकी गणेश एंटरप्रायजेस यांनीही तेवढ्याच दरानुसार काम करण्याची तयारी दर्शविली आहे. इतर दोन निविदाधारकांनी काम करण्यास नकार दिला. हे दोन्ही निविदाधारक काम पूर्ण करण्यास सक्षम आहेत. त्यांचे दर स्वीकृत करण्यास आणि करारनामा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.
याबाबत आकाश परवाना विभागाचे उपायुक्त सचिन ढोले म्हणाले, महापालिकेने शहरातील अनधिकृत जाहिरात फलक काढण्यासाठी अरबाज इंजिनिअरिंग अँन्ड सिव्हील कन्स्ट्रक्शन आणि गणेश एंटरप्रायजेस यांची नेमणूक केली. फलक काढणारी यंत्रणा त्यांचीच राहणार आहे. डिजीटल बोर्ड काढले जाणार आहेत. पालिकेने सांगितलेले अनधिकृत फलक काढणे, ते भंगारात विक्री करुन त्यापैकी ९९ टक्के रक्कम या संस्था महापालिकेला देणार आहेत. शहरात जेवढे अनधिकृत फलक उभे राहतील. ते या संस्थांनी काढून भंगारमध्ये विक्री करायचे आणि त्यातून मिळणाऱ्या रक्कमेपैकी ९९ टक्के रक्कम महापालिकेला द्यायची आहे.


















