न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी सहआयुक्त आशादेवी दुरगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, समितीच्या उर्वरित ८ सदस्यपदासाठी विविध अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
महापालिका सेवातील महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळवणुकीपासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई अणि निवारण) अधिनियम २०१३ नुसार ही समिती पालिकेने स्थापन केली आहे. समितीवर अध्यक्ष व सदस्य असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्थानांतर, पदोन्नती, निवृत्ती व प्रशासकीय कामकाज विचारत घेऊन समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे.
सह आयुक्त दुरगडे या अध्यक्ष आहेत. तर, समिती सदस्य सहायक आयुक्त सुषमा शिंदे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, लघुलेखक सुनीता पळसकर आहेत. कर्मचारी महासंघ प्रतिनिधी म्हणून उपलेखापाल शुभांगी चव्हाण या आहेत.
अशासकीय संस्था सदस्य म्हणून जिव्हाळा महिला विकास प्रतिष्ठानच्या कविता खराडे आहेत. समिती सदस्य सामान्य प्रशासन विभागप्रमुख आणि आरोग्य विभागाचे आरोग्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत. सदस्य सचिव कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप आहेत, असे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी नुकतेच काढले आहेत.
















