न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०२२) :- मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या १८ वाहनांचा ई-लिलाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथे ७ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मोशी प्राधिकरण येथील आवारात ६ डिसेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत वाहने पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. यामध्ये बस, एचजीव्ही, एक्सकॅवेट, एलजीव्ही, टुरिस्ट टॅक्सी व रिक्षा या वाहनांचा समावेश आहे. ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहणार आहे. वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, तहसीलदार, पुणे शहर व हवेली, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवड यांच्या सूचनाफलकांवर उपलब्ध आहे.
ई-लिलावात सहभागी होण्यासाठी २४ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत https://eauction.gov.in/eauction/#/ या संकेतस्थळावर नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध असणार आहे. २४ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत खटला विभागात सकाळी १० ते सायंकाळी ६ प्रत्येक वाहनासाठी ५० हजार रकमेचा धनाकर्ष ‘डीवाय आरटीओ पिंपरी-चिंचवड’ या नावे सादर करावा. सोबत ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती, नाव नोंदणी व कागदपत्रे पडताळणी व मंजुरीसाठी सादर करणे गरजेचे आहे. ‘वाहने जशी आहेत तशी’ या तत्वावर जाहीर ई-लिलावाद्वारे विकली जातील, असे कराधान प्राधिकारी तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळवले आहे.
















