न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२२) :- इंद्रायणी नदीवरील आंबी पूल वाहतुकीसाठी खुला करावा, या मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांच्या नेतृत्वाखाली इंद्रायणी नदीपात्रातील पाण्यात कुडकुडत थांबत साडेतीन तास आंदोलन केले. अखेर इंद्रायणी नदीवरील आंबी पूल व रस्ता हलकी वाहने व दुचाकीसाठी येत्या दहा दिवसांत वाहतुकीसाठी खुला करू, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर तसेच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
सोमवारी (दि.१२) सकाळी दहा वाजता सुरू केलेले जलसमाधी आंदोलन दुपारी दीडपर्यंत चालले. यावेळी नितीन मराठे, नवलाख उंबरे गावचे माजी सरपंच नागेश शिर्के, वराळेचे उपसरपंच जनार्दन पारगे, माजी उपसरपंच नीलेश शिंदे, योगेश मराठे, दादाभाऊ मराठे, प्रभाकर मराठे, जितेंद्र मराठे, सुनील मराठे, वैभव हिंगणे, शरद भोंगाडे, प्रदीप बनसोडे, प्रशांत मराठे, रवींद्र घोजगे, आकाश मराठे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी माजी सभापती धोंडीबा मराठे, संतोष शिंदे, अॅड. वैभव हिंगणे, सचिन मराठे, आकाश मराठे, संदीप गोंदेगावे, संदीप कदम, संदीप घोजगे उपस्थित होते.
कामास सुरुवात केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. त्यानंतर काम सुरु करण्यात आल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनागोंदी व गलथान कारभाराविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला. जवळपास साडेतीन तास आंदोलन चालले. यावेळी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा नितीन मराठे यांनी दिला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग वडगाव मावळचे शाखा अभियंता नंदकुमार खोत यांनी पुढील दहा दिवसांमध्ये दुचाकी व हलक्या वाहनांसाठी हा पूल खुला करू, असे लेखी आश्वासन दिले.


















