- १ ते ५०० चौरस मीटरपर्यंतचे अधिकार नगररचनाकारांना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२२) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा मोठा क्षेत्र विस्तार लक्षात घेता नागरिकांना रहिवाशी, औद्योगिक व वाणिज्य वापरासाठी बांधकाम परवानगी देण्याच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण केले आहे. क्षेत्रफळनिहाय बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार अधिकाऱ्यांमध्ये विभागून दिले आहेत.
पीएमआरडीएचे एकूण क्षेत्र ६९१४.२६ चौरस किलोमीटर इतके आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार, या क्षेत्रातंर्गत येणाऱ्या परिसराची एकूण लोकसंख्या ७३.२१ लाख इतकी आहे. पुणे महानगर प्रदेशामध्ये एकूण २ महानगरपालिका, ७ नगरपालिका, २ नगर पंचायत, ३ कॅन्टोन्मेंट बोर्ड, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन (एमएडीसी) आणि ८१४ गावांचा समावेश आहे.
संबंधित परिसरातून प्राधिकरणाकडे विविध अर्जदार, वास्तुविशारदांकडून प्राधिकरण हद्दीतील भूखंडावर रहिवासी, औद्योगिक व वाणिज्य वापरासाठी बांधकाम परवानगी मिळण्याबाबत विविध नवीन/सुधारित प्रस्ताव साद केले जातात. नागरिकांच्या सोयीसाठी हे प्रस्ताव शीघ्रतेने व कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी क्षेत्रफळ निहाय बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार प्रदान केले आहे.
१ ते ५०० चौरस मीटरपर्यंतचे अधिकार नगररचनाकार यांच्याकडे असणार आहेत. ५०० चौरस मीटर ते १ हजार चौरस मीटर क्षेत्रापर्यंत महानगर नियोजनकार यांच्याकडे तर, १ हजार चौरस मीटरपासून पुढील भूखंडांसाठी महानगर आयुक्त तथ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार प्रदान केले आहे. याबाबत सुधारित आदेश काढण्यात आला आहे. त्यानुसार बांधकाम परवानगीबाबत कामकाज गुरुवारपासून (दि. १५) सुरु केले आहे.


















