न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२२) :- पिंपळे गुरव येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याप्रकरणी महापालिकेतील प्रभारी कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि दोन कनिष्ठ अभियंता अशा चौघांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. निकृष्ट अडीच लाख खर्चाचे काम महापालिकेने ठेकेदाराकडून करून घेतले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पिंपळेगुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालय ते नर्मदा गार्डन रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत तक्रारी आल्या होत्या. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे यांनीही कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार स्थापत्य विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अनिल राऊत, उपअभियंता विजयसिंह भोसले, कनिष्ठ अभियंता सचिन सानप, सचिन मगर यांची विभागीय चौकशी सुरू झाली आहे. ‘
पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालय ते नर्मदा गार्डन ४१.१६ मीटर रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत तक्रारी आल्याने चौकशीसाठी ९ मे रोजी एकसदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली होती. तसेच रस्त्याची दुरुस्ती केली होती. वास्तविक, ही दुरुस्ती ४८ तासांच्या आत करणे अपेक्षित होते. मात्र, त्यासाठी महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागला. त्यामुळे भेगा पडल्या, असा निष्कर्ष समितीने काढला. त्यानंतर तेथील कांक्रीटची तपासणी केली. त्यात दर्जा कमी असल्याचे आढळून आले. त्यानंतर पावणे दोन लाखांची दुरुस्ती केली होती.
महापालिकेचे सल्लागार, पालिका अधिका-यांनी ठेकेदारास वारंवार ग्रो कटिंग करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, ते ठेकेदाराने केले नाही. तसेच रस्त्याची पाच वर्षे कालावधीकरिता देखभाल दुरुस्तीच्या जबाबदारीनुसार दुरुस्तीही करून दिली. याप्रकरणी अधिकाऱ्यांचे खुलासे संयुक्तिक नसल्याने आयुक्त शेखर सिंह यांनी विभागीय चौकशी सुरू केली आहे.
















