- उपजिल्हा रुग्णालय म्हणून मिळाली मान्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२२) :- चाकण उपजिल्हा रुग्णालय प्रस्तावास विशेष बाब म्हणून राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे येथे १०० खाटा वाढणार असून त्याचा फायदा परिसरातील रुग्णांना होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली मागणी राज्य सरकारने मान्य केल्याने चाकण पंचक्रोशीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
चाकण शहर व परिसरातील वाढते नागरीकीकरण व औद्योगिकवाढीमुळे मोठ्या लोकसंख्येच्या या भागासाठी असलेले चाकण ग्रामीण रुग्णालय अपुऱ्या सोयीसुविधांमुळे रुग्णसेवा पुरविण्यात अपयशी ठरत होते. बहुतांश नागरिकांना उपचारासाठी पुणे शहरातील खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत होता. ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समक्ष भेट घेऊन निदर्शनास आणून दिली.
ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याची मागणी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली होती. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागास्या अवर मुख्य सचिवांना दिले. त्यानंतर आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्याने प्रस्ताव मंजुरीसाठी सादर होऊन चाकण उपजिल्हा रुग्णालयास राज्याची मंजुरी मिळाली आहे.


















