न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च) :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेत तळेगाव दाभाडे येथील शेतकरी परिवारातील स्वाती दाभाडे मुलींमध्ये प्रथम क्रमांकाने उतीर्ण झाली आहे.
चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटी व स्व. राजीव गांधी प्रतिठाणच्या वतीने शुक्रवार (दि. ८) रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, स्वाती दाभाडे हीचा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते काँग्रेस भवन येथे संभाजी महाराजांचा पुतळा व शाल देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, मुलीची आई लक्ष्मी दाभाडे, वडील किसन दाभाडे, विशाल दाभाडे, प्रियंका दाभाडे, जयराम शिंदे, संदेश नवले, आबा खराडे आदी उपस्थित होते.
चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष संदेश नवले म्हणाले की, ”दाभाडे सरकार घराण्यातील कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील शेती करणारे आई-वडील यांच्या कष्टास आज मुलीने यश मिळवून दिले आहे. यापुढे सर्वच क्षेत्रात भरारी घे. तुझा आदर्श इतर मुलींनी घेतला पाहिजे. अशा गुणी मुलीचा यथोचीत सत्कार करावा हा प्रतिष्ठाणचा हेतू आहे.
कुमारी स्वाती म्हणाली की, मी भारावून गेलेली असून, गोरगरीबांचे व शेतकरी कामगार यांच्या सेवेसाठी मी सचोटीने कार्यतत्पर राहिल. चव्हाण साहेबांचा मौलिक आशिर्वाद मला सतत प्रेरणा देईल.











