न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च) :- निगडी-प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल यमुनानगर निगडी येथे जागतिक महिला दिन साजरा झाला आहे. याप्रसंगी विद्यार्थिनी कविता, पोवाडे,भाषणे केली.
कार्यक्रमानिमित्त विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना प्राचार्य सतीश गवळी म्हणाले की, काल त्या होत्या म्हणून आज आपण आहोत. जिजाऊमुळे शिवबा घडले. स्त्री शिक्षणाची चळवळ महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली. ”तिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी” असे जागतिक दिनाचे महत्त्व सांगितले.
पर्यवेक्षिका समिती पाटकर म्हणाल्या की, मुलींनी सर्व क्षेत्रात नावलौकिक मिळवला पाहिजे. खेळात प्राविण्य मिळवून, महिलांचा मान उंचावेल, अशी कामगिरी केली पाहिजे.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी नगरसेविका योगिताताई नागरगोजे यांनी सांगितले की, ”ज्याला स्त्री आई म्हणून कळली, तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री म्हणून बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा शाम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रीयांचा महत्त्वाचा वाटा आहे. ८ मार्च या जागतिक दिनी मुलींनी सर्वच क्षेत्रात अग्रेसर होण्याचा संकल्प करण्याचे आव्हान त्यांनी केले”.
कार्यक्रमास प्राचार्य सतिश गवळी, पर्यवेक्षिका सुमती पाटकर, शाळा समिती अध्यक्ष शरद इनामदार, सुरेखा कामथे, गंगाधर सोनवणे, सविता नाईकरे, उपस्थित होते.
सुजाता ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले, आभार सविता नाईकरे यांनी मानले. उपक्रमाचे कौतुक प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष गजानन एकबोटे व सहकार्यवाहक ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले.











