न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च) :- शिवसेनेने मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना उमेदवारी न देता, युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे किंवा युवा सेनेतील अभ्यासु पदाधिकारी यांनाच मावळ लोकसभेची उमेदवारी द्यावी. त्यामुळे नविन खासदारांकडुन जुना व नवा वाद संपूष्टात आणुन योग्य समन्वय साधता येईल व शिवसेना वाढीसाठी मदत होईल, अशी मागणी गोरेगाव-तिरोडा शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर खासदार बारणे यांनी खासदार झाल्यानंतर मावळमधील व पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसैनिकांवरच सूड उगवला आहे. खासदार आप्पा बारणे हे पदाचा वेळोवेळी गैरवापर करत पक्षाला चुकीची माहीती देऊन, बाहेरील कॉग्रेस व राष्ट्रवादी पक्षांच्याच कार्यकर्त्यांना विविध शासकीय सदस्यपदांची खिरापत वाटली आहे. दगाफटका करणाऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना चालवत आहेत.
बारणे यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्यास शिवसेना पक्षाला मावळमध्ये दगाफटका होऊन पराभवाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे शिवसेनेने आप्पा बारणे यांच्याऐवजी पार्थ अजित पवार यांच्या विरोधात युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे किंवा युवासेनेतील योग्य अभ्यासु उमेदवाराचा विचार करावा.
मावळ लोकसभा मतदार संघात श्रीरंग बारणे हे त्यांनी केलेल्या कतृत्वाने सक्षम उमेदवार नसून, लोकसभा निवडणुकीतही श्रीरंग बारणे यांचा पराभव झाल्यास शिवसेनेसोबत भाजपलाही त्याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागणार आहे. तसे होऊ नये म्हणून शिवसेनेने बारणे यांच्याऐवजी निवडून येणारा सक्षम उमेदवार द्यावा, मागणी भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
निवडणुकीच्या तयारीसाठी आप्पा बारणे यांनी थेरगावमध्ये आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेचा एकही नगरसेवक उपस्थित राहिला नाही. मोजकेच स्वतःच्या मर्जीतील पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले श्रीरंग बारणे हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांच्या बळावर चांगल्या मताधिक्क्याने निवडून आले. मातोश्रीमधुन आपला आदेश आल्याने माझ्या सारख्या सर्वसामान्य कुटूबांतील शिवसैनिकांनी बारणे यांचे काम केले. खासदार झाल्यानंतर बारणे यांचा शिवसैनिकांकडून प्रत्येक ठिकाणी सत्कार व सन्मान करण्यात आला. पण त्यानंतर बारणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सच्च्या शिवसैनिकांवर सूड उगवण्याचे काम केले. सच्च्या शिवसैनिकांना गाडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मोठे करण्याचे काम बारणे यांनी केले.
बारणे यांच्या मनमानी कारभारामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील संख्या १४ नगरसेवकांवरून ९ वर आलेली आहे. यात माझ्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकाला देखील पराभव पत्कारावा लागला. बारणे यांनी व्यवस्थित नियोजन केले असते, तर माझ्या शिवसैनिकांचा पराभव झालाच नसता. शिवसेनेचे किमान २२ ते २५ नगरसेवक पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत निवडुन आले आसते.
पिंपरी-चिंचवड शहर व मावळ शिवसेनेत खासदार आप्पा बारणे यांनी गटातटाचे राजकारण सुरू केले. लोकसभा निवडणुकीत खासदार आप्पा बारणे यांना पुन्हा उमेदवारी दिल्यास निवडणुकीत पक्षाला दगाफटका बसेल. आपल्या शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागेल. निष्ठावंत शिवसैनिकांची खरी व्यथा पाहता मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारीबाबत आपल्या पक्षाने एकदा गंभीरपणे विचार करावा. खासदार आप्पा बारणे यांच्याऐवजी मावळ लोकसभा मतदारसंघात बारणे यांना उमेदवारी न देता युवासेना प्रमुख शिवसेना नेते अदित्य ठाकरे किंवा युवासेनेतील सक्षम अशा पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देण्याबाबत विचार करावा, अशी मागणी मी एक वंदनिय शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक करीत आहे, असे दाखले यांनी या पत्रात म्हटले आहे.











