न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च) :- ‘अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवुनी जाती,’ या स्मृतीला उजाळा देण्यासाठी विद्यार्थीरुपी पाखरे परत एकदा शाळेच्या प्रांगणात अवतरली. उत्सुकता, आनंद, आश्चर्य, कौतुक, मस्ती अशा संमिश्र भावना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर होत्या.
औचित्य होते, नुकत्याच हिंजवडी येथील अकेमी बिझनेस स्कुलमध्ये पार पडलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे. गुरूजनांच्या हस्ते सरस्वती पूजन करून मेळाव्यास सुरूवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा विभा बोके होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अभिषेक बोके उपस्थित होते. यावेळी संस्थेचे संचालक प्रा. संजय धर्माधिकारी, डॉ. सचिन कुलकर्णी, प्रा. मृणाली सानेर, प्रा. राजश्री दिघे, माधवी देशपांडे आदींसह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिषेक बोके यांनी ‘सध्याची शिक्षणपद्धती आणि भविष्यात यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी तयारी’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, की शाळेतून संस्कारीत झालेला विद्यार्थी कधीच माजी विद्यार्थी होऊ शकत नाही. कारण मनुष्य आजीवन काही ना काही शिक्षण घेतच असतो. ज्या शाळेत आपण शिकलो, घडलो तेथे काहीतरी करण्याचे सौभाग्य तुम्हाला लाभले आहे.
संस्थेच्या अध्यक्षा विभा बोके यांनी सांगितले, शाळेने विद्यार्थ्यांना संस्काररुपी शिक्षण दिले आहे. त्यामुळेच हे विद्यार्थी आज सर्व क्षेत्रात मोठ्या पदांवर दिसतात. उद्याचे नागरीक घडविण्याचे कार्य शिक्षणव्यवस्था करीत असते, असेही त्या म्हणाल्या.
महाविद्यालयीन जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी आपली मनोगते सादर केली, एकमेकांसोबत सेल्फी काढले, ग्रुप फोटो काढले, तसेच स्नेहभोजनाचा आस्वादही लुटला. या माजी विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर मित्र मैत्रिणींच्या भेटीचा आनंद ओसंडून वाहत होता. विद्यालयीन जीवनातील गमती जमती सांगत अनेकांनी जुन्या स्मृतींना उजाळा दिला. उत्सुकता, आनंद, आश्चर्य, कौतुक, मस्ती अशा संमिश्र भावना चेहर्यावर दिसत होत्या. या मित्र मैत्रिणींनी यापुढेही व्हॉटसॅप, फेसबुक व प्रत्यक्ष भेटीगाठीच्या माध्यमातून संपर्कात राहण्याचा संकल्प केला. संघटनात्मक वृत्तीने समाज उन्नतीची कामे करावीत, असा आशावादही माजी विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रा. संजय धर्माधिकारी यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच भविष्यातील संस्थेच्या ध्येयधोरणाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सचिन कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. मृणाली सानेर व प्रा. राजश्री दिघे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. संजय धर्माधिकारी यांनी, तर आभार माधवी देशपांडे यांनी मानले.











