न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे २०२३) :- “मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तीव्र भावना उमटल्या. तसेच मी निर्णयाचा पुनर्विचार करावा म्हणून माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होऊन एकमुखाने आवाहन केलं.”
“देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षाचे नेते आणि सहकारी, मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी विनंती केली. लोक माझे सांगाती, हेच माझ्या परीने प्रदीर्घ सार्वजनिक जीवनाचे गमक आहे, माझ्याकडून आपल्या भावनाचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारवून गेलो आहे,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.
“माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत त्यांनी घेतलेला निर्णय याचा विचार करून मी पुन्हा अध्यक्षपदी रहावे या निर्णयाचा मान राखून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून शरद पवार यांनी मंगळवारी ( २ मे ) निवृत्त होण्याची घोषणा केली होती. उत्तराधिकारी निवडण्यासाठी पक्षांच्या नेत्यांची आज बैठकही पार पडली. त्यात शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी आपणच अध्यक्षपदी कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले.