स्थायी सभापती विलास माडिगेरी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च) :- राजकारणात काम करणाऱ्या सर्वांनाच संधी मिळत नाही. आपल्याला स्थायी समिती सभापतीच्या रुपाने जनतेची सेवा आणि विकासाचे काम करण्याची संधी मिळाली आहे. त्याच्या माध्यमातून शहराच्या विकासात भर घालणारे नावीन्यपुर्ण आणि मोठे प्रकल्प करा. भाजपचे नाव मोठे करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांना केल्या. तसेच शहराचा विकास करताना कोणत्याही अडचणी आल्यास राज्य सरकार तुमच्या पाठिशी ठाम उभे राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विलास मडिगेरी यांची वर्णी लागली आहे. निष्ठावान आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या मडिगेरी यांना भाजपने स्थायीचे सभापतीपद दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील वर्षा निवासस्थानी जाऊन मडिगेरी यांनी भेट घेतली. आभार मानले आणि काम करण्याची संधी दिल्याबद्दल ऋण व्यक्त केले.
यावेळी किरण करांडे, सुभाष मडिगेरी, राजेंद्र जगताप, मयूर मडिगेरी उपस्थित होते. स्थायी समिती सभापती काम करण्याची संधी दिल्याबाबत पार्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत या पदाच्या माध्यमातून शहर हिताचे आणि पक्षाच्या संस्कृतीला शोभेल, असे काम करण्याची ग्वाही मडिगेरी यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिली.











