- अजित पवारांनी राष्ट्रवादी सोडली?; राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२३) :- राज्यातील राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सोबत आमदार धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ,धर्माराव बाबा आत्राम, आदिती तटकरे,
संजय बनसोडे, अनिल पाटील यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री पद सोपवण्यात आले आहे. अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आणि नेत्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
राष्ट्रवादीचे अनेक आमदार राजभवनात दाखल झाले होते. अजित पवार सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु, सरकारकडून याबाबत काहीच अधिकृत खुलासा करण्यात आला नव्हता. अखेर, आज दुपारीच काही वेळापूर्व राजभवनात शपथविधी सोहळा झाला. यावेळी अजित पवारांनी राज्याच्या उपुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचं जाहीर केलं. “मी अजित पवार, महाराष्ट्राच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो”, असं अजित पवार म्हणाले.
यानंतर आज अचानक अजित पवार राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत.
दरम्यान, अजित पवार मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. आज सकाळपासून अजित पवारांच्या देवगीरी बंगल्यावर अजित पवार समर्थक आमदारांची बैठक सुरू होती. या बैठकीनंतर अजित पवार राजभवनावर दाखल झाले. त्यांना ४० हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे.
विशेष म्हणजे अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे राष्ट्रवादीतील दिग्गज नेतेही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत.














