न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च) :- “शेतकरी जमिनीत जे खवतो, जे रोवतो, तेच उगवते.. पडलेला ऊस उगवत नाही.. एक लक्षात ठेवावे, कोणीतरी लावले, म्हणून उगवले ! लावलेल्या रोपाचे झाड होते, झाडाच्या सावलीत सारेजण येतात, त्याचा आस्वाद घेतात.. पण ही सावली कुणामुळे, हे सांगण्याचे काम आपले आहे.” शेती, माती, बांध, पिकं, पाणी, वारा, झाडे, पाने अशा ग्रामीण जीवनशैलीतील अनेक प्रतिमा आणि उपमा सांगत एक मुक्त चिंतन केले आहे, माजी खासदार आणि माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडक कार्यकर्त्यांशी काल त्यांनी संवाद साधला.
पिंपरी, चिंचवड, भोसरी परिसरातील गांवखेड्यांची नगरपालिका होणे, येथे लहानमोठे कारखाने आणणे, त्यामूळे रोजगाराची संधी उपलब्ध होणे या सर्व गोष्टी कै. आण्णासाहेब मगर, कै. यशवंतराव चव्हाण यांनी रुजविलेल्या काँग्रेस संस्कृतीचा परिपाक आहे. हीच विचारांची व विकासाची संस्कृती शरदराव पवार आणि पुढे अजितराव पवार यांनी चालू ठेवली. येथील वाढत गेलेले औद्योगीकरण, तळेगाव, चाकण, जेजूरी, रांजणगांव, पौड परिसरातील औद्योगीकरण हे शरदरावांच्या प्रयत्नांतून झालेले आहे. हिंजवडी, तळवडे, खराडी येथील आय.टी.पार्कमुळे लाखोंच्या संख्येने रोजगार उपलब्ध झाले आहेत. हे कोणामूळे झाले, हे सांगायला आपण कमी का पडतो, आम्ही बोललेच पाहिजे, सांगितलेच पाहिजे, असेही ते म्हणाले.
ज्याने केलेय त्याची जाणीव असणे म्हणजे “चाड” असणे आणि एखाद्याविषयी दुसऱ्या कोणास चुकीचे सांगणे म्हणजे चहाडी करणे. खऱ्या माणसाने पहिल्या प्रकारची चाड ठेवावी, मात्र दुसऱ्या प्रकारची चाड (चहाड) करू नये, असेही ते म्हणाले. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागातील लोक रोजगारासाठी या परिसरात आले, येथे स्थिरावले, मुले मोठी झाली, शिकली, त्यांना आय.टी.च्या माध्यमातून स्थैर्य लाभले. हे सारे कोणामुळे घडले, हे सांगायची खरे तर गरज लागू नये. ज्या संस्कृतीने हे सारे घडविले ती आहे काँग्रेस संस्कृती आणि त्याचे वारसदार आहेत, कै. यशवंतराव चव्हाण, शरदराव पवार आणि अजितदादा पवार.. याची जाण आम्ही ठेवलीच पाहिजे. याच परंपरेत आता पार्थ पवार रुजू पाहतात, त्याच्या पाठीशी आपण विश्वासाने ताकद उभी केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
‘रात्र वैऱ्याची नव्हे’ तर, ‘रात्र मतदार राजाची आहे’ असे सांगताना ते म्हणाले, मधाचं पोळं राहिले पाहिजे, माशांना चुकवून पोळ्यातलं नेमका मधाचा गोडवा आम्हाला चाखता आला पाहिजे, हे ध्यानी ठेवून एकमेकांच्या हृदयात घुसून, त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मत मिळविण्याचे कौशल्य आत्मसात करा. “शेतकरी जोंधळ्याची निगा राखताना, वारा आल्यावर घरी जात नाही, ताटवं पडू नये यासाठी, ताटव्याच्या बुडाशी माती लावण्याचे काम करतो. मतदाराच्या बाबतीतही आम्हाला हीच काळजी घ्यावी लागेल, चुकीच्या विचारांची वादळे त्याच्या मनात येवू लागली, कि त्याला सावरता आले पाहिजे, जोंधळा हाती लागला पाहिजे. असेही पाटील यांनी सांगितले.
त्यांचे चिंतन म्हणजे, ते एच. ए. कंपनीचे कार्मिक अधिकारी, पिंपरी चिंचवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नंतर महापालिका आयुक्त, पुण्याचे जिल्हाधिकारी, प्राधिकरणाचे अध्यक्ष या विविध भूमिका पार पडताना केलेली कामगिरी, जोडलेली माणसं आणि विकासरथ पुढे घेऊन जाताना केलेले सारथ्य याचा एक विचारपाठ होता. अत्यंत हसत खेळत, अनेक जुन्या नव्या व्यक्ती व घटनांचा संदर्भ देत पाटील यांनी ही आठवणींची मैफिल रंगविली. त्यातून त्यांनी कार्यकर्त्यांना प्रबोधन केले, प्रशिक्षण दिले आणि शरद पवारांच्या विचारांचा वसा आणि विकासाचा वारसा पार्थच्या रुपाने पुढे जात आहे, त्याला आशिर्वाद देण्याचे मनस्वी आवाहन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य संघटक अरुण बोऱ्हाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, माजी उपमहापौर महंमदभाई पानसरे, मुरलीधर ढगे, विश्रांती पाडळे, पिंपरी चिंचवड सहकारी बँकेचे संस्थापक हरि पवार, चेअरमन तात्या शितोळे, माजी नगरसेवक कैलास थोपटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सचिन मोरे व कुणाल थोपटे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.















