- उपचार खर्च दीड लाखावरून पोहोचला पाच लाखांवर..
- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२३) :- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, प्रमाणपत्र धारण अधिवास करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष दीड लक्ष रूपयांवरून पाच लाख रुपये एवढे करण्याचा निर्णय रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
राज्यात पूर्वी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, यापुढे राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र प्राप्त नागरिकांना आरोग्य संरक्षणाचे कवच प्राप्त झाले आहे. अशा प्रकारे केंद्र व राज्याची एकत्रित योजना राबविणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झाला आहे.
आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे दोन्ही योजनांमधील समाविष्ट उपचारांचा लाभ रुग्णाला मिळणार आहे. तसेच दोन्ही योजनांच्या अंगीकृत रूग्णालयांमध्ये उपचार घेता येणार आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये ९९६, तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये १२०९ उपचार आहेत. यापैकी मागणी नसलेले १८१ उपचार वगळण्यात आले आहे. तर मागणी असलेले ३२८ उपचारांचा समावेश नव्याने करण्यात येत आहे. जन आरोग्य योजनेत उपचारांची संख्या १४७ ने वाढून १३५६ एवढी झाली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत उपचारांची संख्या ३६० ने वाढविण्यात येत आहे. या १३५६ उपचारांपैकी ११९ उपचार केवळ शासकीय रुग्णालयांसाठी राखीव राहतील, असे प्रशासनाने कळविले आहे.
शस्त्रक्रिया, उपचार खर्च मर्यादेतही वाढ…
मूत्रपिंड शस्त्रक्रीयेसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचार खर्च मर्यादा प्रती रूग्ण २.५ लक्ष एवढी मर्यादा आहे. ती आता ४.५ लक्ष रूपये एवढी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रस्ते अपघातासाठीची उपचारांची संख्या ७४ वरून १८४ अशी वाढविण्यात आली आहे. उपचाराच्या खर्च मर्यादित ३० हजार रूपयांवरून प्रती रुग्ण प्रती अपघात १ लक्ष रूपये अशी वाढ करण्यात आली आहे. या योजनेचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला आहे.















