- बेकायदेशीर भाडेकरूंबाबत आक्रमक पवित्रा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव (दि. ०५ ऑगस्ट २०२३) :- वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर भाडेकरार बंधनकारक असून, भाडेकरूंची माहिती भाडेकराराच्या प्रतीसह तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याला देणे सक्तीचे आहे. घरमालकांसह बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भाडेकरूंवर देखील कडक कारवाई करणार असल्याचा इशारा तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिला आहे.
तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्ताने बाहेरच्या ठिकाणाहून, राज्यातून बरेचजण कायम अथवा तात्पुरते राहण्यासाठी येत असतात. अशा लोकांना घर भाड्याने देताना भाडेकरूंची नोंद पोलिस ठाण्याला देणे बंधनकारक असतानाही बरेच घरमालक जाणूनबुजून या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिसरात यापूर्वी भाड्याने घर घेऊन राहणारे काहीजण गुन्हेगारी करून परागंदा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परिसरात वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता सार्वजनिक सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्या हेतूने भाडेकरूंची इथ्यंभूत माहिती पोलिस ठाण्याकडे असणे गरजेचे आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी ‘आपले तळेगाव, सुरक्षित तळेगाव’ उपक्रमांतर्गत बेकायदेशीर भाडेकरूंबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. विहित नमुन्याची प्रत पोलिस ठाण्यात उपलब्ध करण्यात आली आहे. घर भाड्याने देणाऱ्या घरमालकांनी विहित नमुन्यात माहिती भरून त्याला एक भाडेकराराची स्वसाक्षांकीत प्रत जोडून पोलिस ठाण्याच्या [email protected] या मेल आयडीवर अथवा पोलिस ठाण्यात जमा करावी. वाणिज्यिक वापरासाठी भाड्याने दिलेल्या मालमत्तेसाठी देखील हा नियम लागू असणार आहे. माहिती पोलिस ठाण्याला सादर न केल्यास संबंधित घरमालकासह भाडेकरूंवर कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी भाडेकरूंची पोलिस पडताळणी केल्याशिवाय सोसायटीत प्रवेश दिल्यास त्यांच्यावर प्रचलित कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ऑनलाइन भाडेकरूंची पडताळणी केल्यास त्याची एक प्रत देणे बंधनकारक आहे. तसेच कोणी अवाजवी अनामत रक्कम मागत असेल तर पोलिस ठाण्यात कळवावे. याकामी तळेगाव दाभाडे भागातील घरमालक, रहिवासी सोसायट्यांचे चेअरमन, सचिव, घरमालक, भाडेकरू आदींनी सहकार्य करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांनी केले आहे.