न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑगस्ट २०२३) :- पुणे-नाशिक महामार्गावर (दि. ६) रोजी खेड घाटात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला आहे. या प्रकरणी, खेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस निरिक्षक बिरूदेव काबुगडे यांनी फिर्याद दिली आहे. सौरभ नंदलाल पाटील (वय २३, रा. एबीसी जंक्शन आकुर्डी) असे मयत तरुणाचे नाव आहे.
तो आठवडाभरापासून बेपत्ता होता. त्याच्याशी कुठल्याही प्रकारे संपर्क होत नसल्याने नातेवाईकांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात तो हरविल्याची तक्रार दिली होती. त्याची दुचाकी होलेवाडी (ता. खेड) या परिसरात एका शेतात आढळून आली होती. लगतच विहिरीच्या कठड्यावर त्याच्या गाडीची चावी पोलिसांना मिळाली. पुणे नाशिक महामार्गावरील जुन्या खेड घाटात सांडभोरवाडी गावच्या हद्दीत गवताच्या रानात सौरभचा कुजलेल्या अवस्थेत मुत्युदेह मिळून आला.