न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२३) :- परिवहन विभागामार्फत वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) नागरिकांना पोस्टामार्फत घरपोच पाठविले जाते. पण, आता ही सेवा महागणार आहे. कारण, शासनाने या सेवेवर १८ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशावर जीएसटीचा भार येणार आहे.
राज्यातील प्रादेशिक परिवहन विभागामार्फत नागरिकांना वाहन परवाना, वाहन नोंदणी, वाहन परमिट अशा ६० हून अधिक सेवा दिल्या जातात. वाहन खरेदी केल्यानंतर किंवा वाहनांची पुर्ननोंदणी केल्यानंतर नागरिकांकडून २०० रुपये स्मार्ट कार्डचे आणि ५० रुपये पोस्ट चार्जेस भरावे लागत होते.
तसेच नागरिकांना वाहन परवान्यासाठी आरटीओचे २१६ रुपये, २०० रुपये स्मार्ट कार्डचे आणि ५० रुपये पोस्टाचे चार्जेस असे एकूण ४६६ रुपये भरावे लागत होते. पण, आता राज्य शासनाने पहिल्यांदाच आरटीओच्या घरपोच पोस्ट सेवेवर १८ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना आता ८ रुपये अधिक भरावे लागणार आहेत. याबाबतचा आदेश नुकताच काढला आहे.