- लेक अठरा वर्षांची होताच बनणार ‘लखपती’…
- लेक लाडकी’ योजनेला मंत्रीमंडळात मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. 10 ऑक्टोबर 2023) :- मार्च 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेक लाडकी योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्याचा आज अंतिम प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला आहे, या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.आजपासून ही योजना राज्यात लागू होईल, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या की, 1 लाख 1 हजार अशी रक्कम मुलींना दिली जाणार आहे. त्यामुळे आजपासून ही योजना राज्यात लागू होईल. मूळ संकल्पनेनुसार मुलीचा जन्म झाल्यानंतर ती 18 वर्षाची होईपर्यंत ही मदत टप्प्या टप्प्यात दिली जाईल.मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी ही योजना आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आम्ही या योजनेची सुरुवात करत आहोत. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला देखील मागच्या मंत्रिमंडळात मान्यता मिळाली असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.
लेक लाडकी योजना काय आहे?
या योजनेतून महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत केली जाणार आहे.
पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत मुलीला जन्मानंतर 5000 रुपये दिले जातीलत्यानंतर टप्प्याटप्प्यानुसार राज्य सरकारकडून मदत केली जाईल.
मुलगी पहिली इयत्तेत गेल्यानंतर तिला 4000 रुपयांची मदत केली जाईल.
मुलगी सहावीत गेल्यानंतर 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाईल.
मुलगी अकरावीत गेल्यानंतर 8000 रुपयांची आर्थिक मदत केली जाईल.
मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तिला महाराष्ट्र सरकारकडून 75,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.