न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहरात रस्ते आणि पदपथावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू आहे. गणेशोत्सव सणामुळे त्यात खंड पडला होता. आता नव्याने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. ती नियमितपणे सुरू राहणार आहे. त्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्यात आला आहे, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.
अर्बन स्ट्रिट डिजाईननुसार महापालिकेने शहरातील रस्त्यांची रूंदी कमी केली आहे. तर, पदपथाची रुंदी वाढली आहे. त्या पदपथावर विक्रेते आणि दुकानदार अतिक्रमण करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना नाईलाजास्तव रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. तसेच, जनसंवाद सभेतही वारंवार या तक्रारी केल्या जात आहे. त्याची दखल घेऊन आयुक्त सिंह यांनी ५ सप्टेंबरनंतर शहरातील मुख्य ८ रस्त्यांवर कारवाई करण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानंतर काही दिवस कारवाई सुरू झाली. त्यानंतर ती पुन्हा थंड झाली. त्याबाबत विचारले असता ते बोलत होते.
आयुक्त सिंह म्हणाले की, गणेशोत्सवामुळे विविध कामांत महापालिकेचे पथक व्यस्त होते. तसेच, पोलिस यंत्रणा बंदोबस्तात होती. त्यामुळे ते दहा ते बारा दिवस कारवाई बंद होती. कारवाई नियमितपणे व्हावी, म्हणून त्या विभागासाठी भूमि आणि जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या विभागास प्रत्येकी एक उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता दिले आहेत.















