न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ डिसेंबर २०२३) :- तळवडेतील ‘स्पार्कल’ मेणबत्ती (कँडल) तयार करणाऱ्या कंपनीतील स्फोटात सहा महिला कामगारांचा होरपळून मृत्यू झालेल्या दुर्घटनेप्रकरणी कंपनी, जागा मालकासह चौघांविरोधात रात्री उशिरा देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवराज एंटरप्रायजेस कंपनीचे मालक शुभांगी शरद सुतार (वय ३५), शरद सुतार (वय ४०, दोघे रा.पिंपरी सांडस, अशातपुरा फाटा, हवेली, पुणे) जागा मालक जन्नत नजीर शिकलगार, नजीर अमिर शिकलगार ( वय ७१, दोघे रा.मोहननगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महापालिकेचे उप अग्निशमन अधिकारी बाळासाहेब विश्वनाथ वैद्य (वय ३८) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिवराज एंटरप्रायजेस ही कंपनी वाढदिवसाचे स्पार्कल कॅन्डल बनविण्यासाठी स्फोटक व ज्वालाग्रही पदार्थाचा वापर बेकायेदशीर व विनापरवाना करुन चालवत होती. कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काहीएक उपाययोजना केल्याचे दिसुन आले नाही. त्यामुळे कामगारांच्या जिवीतीस धोका निर्माण होवुन त्यांचा मृत्यु होवु शकतो याची जाणीव असतानाही आरोपी यांनी शिवराज एंटरप्रायजेस ही कंपनी बेकायदेशीर विनापरवाना चालु ठेवुन कंपनीतील ०६ कामागराच्या मृत्युस तसेच १० कामगारांना गंभीर जखमी होण्यास कारणीभुत झाले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. वपोनि लकडे पुढील तपास करीत आहेत.












