न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२३) :- प्राधिकरण परिसरातील सेक्टर २७ अ मधील कृष्णा सहकारी सोसायटीच्या कार्यालय परिसरात एक दुर्मिळ खोबरा आंबा अनेक वर्षांपासून उभा आहे. सोसायटीच्या प्रवेश द्वारावर असलेले हे झाड पर्यावरण प्रेमींना अनेक वर्षांपासून आकर्षून घेत आहे. बहरलेल्या झाडाला मोठे खोबऱ्याच्या चवीचे आंबे पाहण्यासाठी दरवर्षी अनेक अभ्यासक तिथे येत असतात. हे झाड कृष्णा सोसायटीच्या प्रदर्शनी भागात असल्याकारणाने सोसायटीतील पदाधिकारी सल्लागार यांनी नियमबाह्यपणे झाडाची मोठी फांदी तोडून रस्त्यावर टाकली.
उद्यान विभागाच्या पदाधिकारी सदस्यांच्या निदर्शनास हि बाब आल्यामुळे पालिकेने तात्काळ कारवाई करत घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यावेळेस पालिका विभागीय उद्यान अधिकारी यांना लक्षात आले की महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ चे उल्लंघन झालेले आहे. त्याचप्रमाणे सहकारी सोसायटी उपविधी अधिनियम चे ही उल्लंघन झालेले आहे. त्यानुसार उद्यान / वृक्ष संवर्धन विभागाने क्र. उद्यान/३अ/का वि २८१०/२०२३ दिनांक २७/१२/२३ अन्वये कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे.
या ठिकाणी आंबा वृक्ष विना परवाना छाटले असल्याने आपणाकडून वृक्ष प्राधिकरण ठराव क्रमांक १४ दिनांक ०६/०७/२०२१ नुसार दंड का वसूल करण्यात येऊ नये, अशी नोटीस उप-आयुक्त रविकिरण घोडके उद्यान/वृक्ष संवर्धन विभाग पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या सहीने कृष्णा सहकारी सोसायटीचे चेअरमन यांना बजावण्यात आलेली आहे. परिसरातील पर्यावरण अभ्यासक व पर्यावरण प्रेमी हे आयुक्त शेखर सिंह यांची या दुर्मिळ झाडासंदर्भात लवकरच भेट घेणार आहेत.













