न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जानेवारी २०२४) :- मकरसंक्रातीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना सार्वजनिक ठिकाणी असलेल्या उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आणि इतर वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरी व ग्रामीण भागात महावितरणच्या उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर्स तसेच इतर वीजयंत्रणा सार्वजनिक ठिकाणी आहेत. मकरसंक्रातीनिमित्त पतंग उडविताना पतंग किंवा मांजा वीजयंत्रणेमध्ये अडकण्याची शक्यता आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत नागरिक किंवा लहान मुलांनी लोखंडी सळई, काठीच्या सहाय्याने वीजयंत्रणेमध्ये अडकलेला मांजा किंवा पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये.
वीजयंत्रणेला स्पर्श होण्याचा किंवा त्यावर चढून जाण्याचा अजाणतेपणी धोका पत्करला जातो. त्यामुळे विजेचा धक्का लागून अपघात होण्याची मोठी शक्यता असते.

















