- पीएमपीएमएल बस चालक व वाहकावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२४) :- तिकिटावरून प्रवासी महिला आणि पीएमपीएमएल बस चालक व वाहकामध्ये बाचाबाची झाली. चालक आणि वाहकाने इतर प्रवाशांना उतरवून संबंधित महिलेला डेपोमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेने नातेवाइकांना फोन करून स्वतःची सुटका करून घेतली. याप्रकरणी बसचालक आणि वाहकास अटक केली. तळेगाव स्टेशन चौक परिसरात रविवारी (दि. २८) ही घटना घडली.
बसचालक नवनाथ व्यंकटराव ढंगे (२८, रा. मोईगाव), वाहक मुजा गणपती लुट्टे (३०, रा. रूपीनगर, निगडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महिलेने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तळेगाव स्टेशनपासून निगडीकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसने प्रवास करत होत्या. तिकिटावरून प्रवासी महिला आणि वाहक यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर चालकाने महिलेची मोबाइलमध्ये शूटिंग केली. त्याबाबत जाब विचारत महिला त्यांच्या अंगावर धावून गेली आणि त्यांच्या हातातील मोबाइल काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने महिलेचा विनयभंग केला, चालक व वाहक या दोघांनी बसमधील इतर प्रवाशांना सोडून फिर्यादी महिलेला डेपोकडे नेण्याचा प्रयत्न केला. तिने नातेवाइकांना फोन करून बोलावून घेतले. रस्त्यात तिच्या नातेवाइकांनी बस अडवून तिची सुटका केली. पोलिस उपनिरीक्षक अशोक कोकाटे तपास करीत आहेत.