- पाणी पुरवठ्याबाबत होतंय ‘मापात पाप’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२४) :- उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच शहरवासियांना पाणी टंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, भोसरी, दिघी भागात पाण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नळाला कमी दाबाने पाणी सोडले जात असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून ५१० एमएलडी पाणी दररोज उचलले जाते. तरीही, चिखली, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव, भोसरी, दिघी भागात पाण्याची समस्या कायम राहिली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने आंद्रा धरणातून १०० एमएलडी मंजूर पाणी कोटा उपलब्ध करून या भागात पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सुरुवातीला ५० एमएलडी पाणी उलचण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यामध्ये २५ एमएलडीने वाढ करण्यात आली. ७५ एमएलडी पाणी चिखली येथील जलशुध्दीकरण केंद्रात साठवून त्यावर प्रक्रिया केल्यानंतर या भागाला वितरित करण्यास सुरुवात केली. मात्र, मागील काही दिवसांपासून आंद्रा धरणातून इंद्रायणी पात्रात सोडण्यात येणारे पाणी कमी करण्यात आले आहे. सध्या उपसा करण्यात येणाऱ्या पाण्यात ३० ते ३५ एमएलडी तूट जाणवत आहे. त्यामुळे उचलण्यात येणारे ४० ते ४५ एमएलडी पाणी वितरित केले जात आहे. हे पाणी अपुरे व कमी दाबाने सोडले जात असल्यामुळे चिखली, मोशी,चर्होली भागात तक्रारी वाढल्या आहेत.
आंद्रा धरणातून पाणी कमी येत असल्याने याबाबत महापालिकेने जलसंपदा विभागाच्या अधिका-यांशी संपर्क साधला आहे. ठरलेल्या कोट्यानुसार पाणी सोडण्यात येत असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. पाणी कमी केले असेल तर त्यासंदर्भात कळवले जात नसल्यामुळे समस्यांवर मार्ग काढणे कठीण झाले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आयुक्त आणि पाटबंधारे खात्यातील अधिकारी यांच्यात चर्चा घडवून आणली जाईल, असे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.
सध्या निघोजे बंधाऱ्यातून ४० एमएलडी पाणी उचलण्यात येते. पाणी कोट्यात ३० ते ३५ टक्के तूट जाणवत आहे. निघोजे बंधारा लीकेज असल्यामुळे त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात मातीचा बंधारा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून यामुळे शहरासाठी अपेक्षित पाणी उपलब्ध होईल. भविष्यात पाण्याची समस्या उद्भवणार नाही.
– श्रीकांत सवणे, मुख्य अभियंता, पाणी पुरवठा विभाग…














