- शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीने केलीयं भलतीच गोची?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२४) :- शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या २०१९ च्या निवडणुकीत भोसरी विधानसभेतील भाजपच्या माजी नगरसेवकांनी शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह घराघरांत पोचवत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घड्याळाविरोधात प्रचार केला होता. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांना हेच घड्याळ चिन्ह घराघरांत पोचवावे लागणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्र लढणार असल्याने महापालिकेच्या निवडणुकीत याच नगरसेवकांना घड्याळाला विरोध करावा लागणार असल्याची स्थिती निर्माण झाल्याने भाजपचे माजी नगरसेवक संभ्रमावस्थेत आहेत.
शिरूर लोकसभा मतदार संघात २०१९ मध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे महायुतीच्या शिवसेनेकडून निवडणूक लढले होते. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे महायुतीकडूनच लढत देत आहेत. मात्र; शिरूर लोकसभेची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाकडे गेल्याने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटात प्रवेश करून घड्याळाच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाले आहे.
भोसरी विधानसभेत भाजपचे गेल्या निवडणुकीत ३२ नगरसेवक निवडून आले होते. भाजपच्या एका माजी नगरसेवकाचा मृत्यू झाला आहे. या नगरसेवकांनी २०१९ च्या शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे धनुष्यबाण चिन्ह घराघरांत पोचवत प्रचार केला होता. मात्र; या वेळी भाजपच्या माजी नगरसेवकांना घड्याळाचे चिन्ह घराघरांत पोचवावे लागणार आहे.
लोकसभा आणि विधानसभेसाठी जरी महायुती असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याचे या अगोदरच महायुतीच्या नेत्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता लोकसभेच्या निवडणुकीत घड्याळाचे चिन्ह घराघरांत पोचविणाऱ्या आणि घड्याळाचेच बटन दाबून मतदान करा, असे आवाहन करणाऱ्या भाजपच्या माजी नगरसेवकांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत मात्र घड्याळाविरोधात निवडणूक लढवावी लागणार असल्याची परिस्थिती असल्याने भाजपच्या माजी नगरसेवकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाव न छापण्याच्या अटीवर भाजपच्या एका माजी नगरसेविकेने सांगितले, की लोकसभेच्या निवडणुकीत घड्याळ चिन्हाचे बटन दाबायला सांगायचे आणि महापालिकेच्या निवडणुकीत घड्याळाला मत देऊ नका, असे सांगायचे. त्यामुळे मतदारांमध्येही संभ्रम निर्माण होणार आहे.
आढळरावांना भोसरीतून मताधिक्य…
शिरूर लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना १ लाख २५ हजार ३३६ मते मिळाली होती. तर; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना ८८ हजार २५९ मते मिळाली होती. या निवडणुकीत आढळराव पाटील यांचा पराभव झाला असला तरी भोसरी विधानसभेतून त्यांना ३७ हजार ७७ मतांचे मताधिक्य मिळाले होते.
शिरूर लोकसभा मतदार संघातील निवडणूक ही महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट होणार आहे. मात्र ही निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी प्रतिष्ठेची केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पाडण्याचा पण केला आहे. तर; माजी कृषिमंत्री शरद पवार यांनीही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे ही निवडणूक काका-पुतण्यांमध्येच चुरशीची होणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.