- आवश्यक कागदपत्रे अशी आहेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२४) :- तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने संपादित जमीन मालकांना ६.२५ टक्क्यांप्रमाणे परतावा देण्यास शासनाच्या नगर विकास विभागाकडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे संबंधितांनी विहीत नमुन्यातील अर्ज पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यालयात सादर करावा, असे आवाहन करण्यात येत आले आहे.
अर्जासोबत १९७० ते आतापर्यंतचे सातबारा उतारे, फेरफार, विहित अर्जात नमूद केलेले प्रतिज्ञापत्र, पाचशे रुपयांच्या मुद्रांकावर मूळ मालक वारसदारांनी केलेले क्षत्रिपूर्ती बंदपत्र, मूळ जमीनमालक मृत असल्यास मृत्यूचा दाखला, जमीन मालक मृत असल्यास न्यायालयाचे वारस प्रमाणपत्र / ज्या फेरफार नोंदीची जमीन मालक मृत झाल्यानंतर वारसाचे नावे समाविष्ट झाली आहे, त्या फेरफारचा उतारा, विशेष संपादनअधिकारी यांच्याकडील संपादनाचा मूळ दाखला, भूसंपादन उपजिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी व संपादन दाखला मिळण्यासाठी केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती, जमीन संपादनाबाबत अथवा मोबदल्यात वाढ करण्याबाबत कोणत्याही न्यायालयात दावा दाखल केलेला नाही तसेच अन्य कोणत्याही कारणास्तव न्यायालयात दावा दाखल नाही अथवा असल्यास तो काढून घेतलेला आहे, त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र अनिवार्य आहे, असे पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी सांगितले.
१९७२ ते १९८३ या कालावधीत तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. संबंधित पात्र शेतकऱ्यांना ६.२५ टक्क्यांप्रमाणे जमीन परतावा मिळण्याकामी पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत. विहीत नमुन्यातील अर्ज भरून देणे आवश्यक आहे.














