न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सिंधुदुर्ग (दि. २८ ऑगस्ट २०२४) :- मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमी संतप्त झाले. त्याठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात राडा झाला.
यावेळी शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन केला. आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर धरणा देत असताना उद्धव ठाकरे यांनी फोन करुन त्यांना हिंमत दिली. मुख्य प्रवेशद्वारावर नारायण राणे आणि त्यांचे समर्थक थांबून आहे. त्याच ठिकाणावरुन किल्ल्यावर जाण्याची मागणी महाविकास आघाडीचे नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे राजकोट किल्ल्यावर तणाव निर्माण झाला.
राजकोट किल्ल्यावर आंदोलन सुरु आहे. त्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतली. काय चाललेले आहे, कसे चालले आहे. त्याची विचारणा केली. त्याठिकाणी किती भ्रष्टाचार झाला ते पाहून या. म्हणजे भाजपचा भ्रष्टाचार देशभरासमोर मांडता येईल. आम्ही शिवसैनिक आहोत. आम्ही घाबरणार नाही, अशी हिंमत देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी फोन केला, असे आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पोलिसांनी आदित्य ठाकरे यांची सुरक्षा वाढवली आहे.
नारायण राणे समर्थकांनी किल्ल्याचा मुख्य दरवाजा दीड तासापासून अडवून धरला होता. त्यानंतर त्यांनी हा दरवाजा मोकळा करण्यास सुरुवात केली. भाजप आणि मविआमध्ये सुरु असलेला वाद मिटवण्यासाठी जयंत पाटील किल्ल्यावर दाखल झाले. त्यांनी नितेश राणे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी वैभव नाईक आणि आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. दुसरीकडे आदित्य ठाकरे आंदोलनावर ठाम होते. जोपर्यंत भाजप कार्यकर्ते किल्ल्यातून बाहेर पडणार नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरु राहणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. राणे आणि त्यांचे समर्थक निघून गेल्यावर आम्ही त्याठिकाणी जाऊ, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.