न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२४) :- ढोल-ताशांच्या गजरात,’मोरया मोरया’च्या जयघोषात चिंचवड येथील श्रीमन् महासाधू मोरया गोसावी महाराजांच्या श्री मंगलमूर्तीच्या पालखीने भाद्रपदी यात्रेसाठी बुधवारी (दि. ४) मोरगावकडे प्रस्थान ठेवले.
चिंचवड येथील मंगलमूर्ती वाड्यात चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी पूजाविधी झाल्यावर श्री मंगलमूर्ती घेऊन श्री मोरया गोसावी समाधी मंदिराकडे मार्गस्थ झाली. तेथे श्री मोरया गोसावी आणि सप्त सत्पुरुषांच्या समाधीची श्री मंगलमूर्तीची भेट मंदार महाराज देव यांनी घडविली.
चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, अॅड. देवराज डहाळे, अॅड. नरेंद्र देव यांनी श्री मंगलमूर्तीच्या स्वारीला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात चिंचवडमधील समस्त ग्रामस्थ या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
या वेळी मंदार महाराज देव यांच्या हस्ते भाविकांना डाळीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मंदार महाराज देव, विश्वस्त जितेंद्र देव, अॅड. देवराज डहाळे, केशव विध्वांस यांच्या हस्ते या पालखी प्रस्थान सोहळ्यात माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राजाभाऊ गोलांडे, विठ्ठल ऊर्फ नाना काटे, सुरेश भोईर, मधुकर चिंचवडे, अश्विनी चिंचवडे तसेच भारत केसरी पै. विजय गावडे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर मंदार देव महाराज आणि इतर सर्व विश्वस्त यांच्या हस्ते वाद्यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली. या वेळी भाविकांनी मोरयाचा जयघोष केला. त्यानंतर पालखी मार्गस्थ झाली.
एकनाथ मंगल कार्यालयातच बुधवारी (दि. ४) पालखीचा मुक्काम असेल. गुरुवारी (दि. ५) पहाटे प्रस्थान करेल. सासवड येथे गुरुवारी रात्री दुसरा मुक्काम असेल, शुक्रवारी (दि.६) सकाळी रासकर मळ्याच्या दिशेने निघेल. श्री क्षेत्र जेजुरी, मावडी, ढोले मळामार्गे मोरगाव येथे रात्री नऊ वाजता पालखी पोहोचेल. शनिवार (दि.७) आणि रविवारी (दि.८) पालखीचा मुक्काम मोरगावात असेल. ९ सप्टेंबरपासून पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल. १३ सप्टेंबरला पालखी मंगलमूर्ती वाड्यात येईल.