न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२४) :- पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापालिका शाळांतील इयत्ता ५ वी १० वी तील विद्यार्थ्यांसाठी ‘पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती व सजावट’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांद्वारे बनविण्यात आलेल्या मुर्त्यांचे प्रदर्शन आज चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेला शाळा आणि विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, अजिंक्य येळे, किशोर ननावरे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे , जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उप अभियंता योगेश आल्हाट यांच्यासह या स्पर्धेत सहभागी शाळांतील शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पर्यावरणपूरक उत्सव साजरे करणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविण्यात येतात. शहरातील नागरिकांचा देखील या उपक्रमांस उस्फुर्त प्रतिसाद देखील मिळत आहे. गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने ‘पर्यावरण पूरक गणेश मूर्ती निर्मिती व सजावट’ या स्पर्धेचे आयोजन आज करण्यात आले होते. या स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ४१ शाळांनी यात सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत सहभागी शाळांतील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा पर्यावरण पूरक गणेश मूर्ती आपल्या हातांनी बनवल्या होत्या. तसेच सजावट देखील आकर्षक केली होती. यातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलता आणि कल्पकतेचा परिपाक दिसून आला. काही विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून गणेश मुर्त्या बनवल्या होत्या तर काहींनी लाकडाचा भुसा, कागदाच्या लगद्यापासून तर अगदी झाडांच्या पानांपासून देखील गणेश मुर्त्या बनवल्या होत्या. मूर्ती बनवण्यासाठी नैसर्गिक चिकणमाती, बांबू आणि लाकडाचे तुकडे, उसाच्या काड्या तसेच तुरटीमध्ये मिसळलेल्या चिकणमातीचा वापर केला होता. तर मूर्ती रंगविण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला होता. सजावटीसाठी जे साहित्य मुलांनी वापरले होते त्यातही नैसर्गिक फुले, पाने, कागद, धागे, शाश्वत, नैसर्गिकरित्या विघटन होणा-या वस्तू, नालीदार चादरी, कापड, लाकूड, बांबू आदी साहित्याचा समावेश होता. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीमचे सुंदर सादरीकरण केले. महापालिकेच्या वतीने बक्षीस वितरण कार्यक्रमात विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी दिली.
पर्यावरणास अनुकूल तत्त्वांचे पालन तसेच पर्यावरणावर एकूण परिणाम तत्वावर आधारित इको फ्रेंडली गणेश मूर्त्यांचे मूल्यांकन करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण सहायक आयुक्त विजयकुमार थोरात, अजिंक्य येळे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, प्रज्ञा ठाकूर आणि योगेश आल्हाट यांनी केले.