- घरफोडी, चोरी, मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले..
- शिवसेना विभागप्रमुख नितीन बोंडे यांचा महावितरणाला इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२४) :- रुपीनगर तळवडे भागात काही महिन्यांपासून बत्त्ती गुल होण्याच्या समस्येत वाढ झाली आहे. सतत पाच ते आठ तासापर्यंत या भागाचा वीजपुरवठा बंद असतो. त्यामुळे घरफोडी, चोरी, मुलींचे छेडछाड, असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांसह महिला, कामगार, शालेय मुलांना विज समस्यांचा सामना करावा लागत आहे. याची दखल घेऊन रुपीनगर तळवडे शिवसेना विभागप्रमुख नितीन बोंडे यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय गाठले. निवेदन देऊन अनियमित वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा शिवसेना स्टाईलने गणपती विसर्जनानंतर धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यावेळी त्यांच्यासोबत गणेश भिंगारे, उपविभाग प्रमुख सर्जेराव कचरे, शाखाप्रमुख कैलास तोडकर, उपशाखाप्रमुख रमेश पाटोळे, ज्येष्ठ शिवसैनिक नरेंद्र पाटील, युवा सेना शाखाप्रमुख सुनील समगिर, सुजाता काटे महिला विधानसभा संघटक आदी उपस्थित होते.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, ”प्रभाग क्रमांक १२, रुपीनगर तळवडेमधील विस्कळीत विज पुरवठ्यामुळे येथील नागरिकांच्या समस्यांत वाढ झाली आहे. याबाबत स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी यांना वेळोवेळी निवेदन, तोंडी सूचना देऊन काहीही सुधारणा होतांना दिसून येत नाही. याशिवाय या भागातील विद्युत रोहित्राच्या समस्या वाढल्या आहेत. रोहित्रावरून पैसे खाऊन लोड मंजूर करून अडचणीत वाढ केली जात आहे. या भागातील एका अभियंत्याला अशाच एका प्रकरणात निलंबित करण्यात आले होते. तरीही ग्राउंड लेव्हलला अद्याप सुधारणा झालेली नाही.
सध्या तळवडे भागातील वीजपुरवठा हा सगळ्यात कळीचा विषय झाला आहे. याबाबत कुठल्याही कार्यालयाकडून दखल घेतली जात नसल्याने आंदोलना शिवाय पर्याय राहिलेला नाही. याशिवाय औद्योगिक आणि व्यापारी यांनाही वीजपुरवठ्यात अडचण येत असल्याने मोठ्या मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महावितरण विज कंपनी आपले कर्तव्य पार पाडण्यात अपयशी असून नागरिकांना कुणीही वाली राहिले नसल्याची परिस्थिती आहे. विस्कळीत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास या विरोधात आपल्या कार्यालयात शिवसेना स्टाईलने गणपती विसर्जना नंतर धरणे आंदोलन केले जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास आम्ही जबाबदार नाही, असं या निवेदनात नितीन बोंडे यांनी म्हटले आहे”.

















