न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२४) :- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण २९ सप्टेंबर रोजी केलं जाईल असं राज्य सरकारतर्फे सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आज या योजनेतील पैशांचं वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
आदिती तटकरे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून दिनांक २९ सप्टेंबर रोजी ३४,७४,११६ भगिनींना ५२१ कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे. उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे. ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हफ्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले आहेत.
ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता, मात्र त्यांचा अर्ज स्वीकारला गेला नाही, किंवा अर्ज भरताना चुका केल्या होत्या त्या महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्याचबरोबर बँक खातं व आधार क्रमांक लिंक न केलेल्या महिलांनाही या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. या महिलांना अर्जातील चुका दुरुस्त करून पुन्हा एकदा अर्ज भरावा लागेल.












