न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२४) :- जागतिक पर्यटन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगणच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. छायाचित्र प्रदर्शन, तसेच तज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.
तुषार कोडोलीकर यांचे ‘भारतीय वारसा स्थळे’ या विषयावरील मोबाईल छायाचित्रणाचे प्रदर्शन खास आकर्षण होते. सोबतच २७ सप्टेंबर रोजी ‘गिरिदुर्ग व स्थापत्यशास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांचे महत्त्व’ या विषयावरील सादरीकरण स्पर्धेस पिंपरी चिंचवड, पुणे, भोर, शिरूर आदी तालुक्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात १६ शाळांतून २६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध गड – किल्ल्यांचा सखोल अभ्यास करून पॉवर पॉईंट, तसेच चलचित्रांच्या माध्यमातून समोर मांडला. विजेत्यांना रोख रक्कम तसेच विज्ञान पुस्तके पारितोषिक म्हणून देण्यात आले.
पारितोषिक वितरण विठ्ठल रायगावकर विज्ञान प्रसारक, रायगावकर, तुषार कोडोलीकर छायाचित्रकार, नंदकुमार कासार मुख्य कार्यकारी अधिकारी, सायन्स पार्क यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण इतिहास संशोधक व लेखक अनुराग वैद्य, गिर्यारोहक विनायक बेलोसे यांनी केले. पाठोपाठ त्यांचे भारतीय वारसा स्थळे, दुर्गभ्रमंती व पर्यटन विषयावर व्याख्यान देखील झाले. सुशांत पवार यांचे नामशेष होण्याच्या उंबरठ्यावरील पक्षी विषयावरील व्याख्यान झाले. तर समारोपाच्या दिवशी विठ्ठल रायगावकर यांचे विज्ञान भागीरथीचे भगीरथ या विषयावर व्याख्यान झाले. ही सर्व व्याख्याने संवादात्मक होऊन यांतून सर्व व्याख्यात्यांनी विविध नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या, अनेक वारसा स्थळे जपणाऱ्या आपल्या देशात पर्यटन करताना जागरूक व जबाबदार पर्यटक कसे व्हावे, तसेच वैज्ञानिक दृष्टीकोण कसा वृद्धिंगत करता येईल याबद्दल जागृती निर्माण केली.
कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विनामूल्य होते. ३ दिवसांत कमीत कमी २५०० प्रेक्षकांनी यांचा लाभ घेतला. सायन्स पार्कचे संचालक प्रवीण तुपे यांच्या सहकार्याने या कार्यक्रमांचे संपूर्ण नियोजन सोनल थोरवे, वैज्ञानिक अधिकारी यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने केले.
विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे :-
१. प्रथम क्रमांक – पूर्वा राकेश पगारे , विद्यानंद भवन हायस्कूल, निगडी
२. द्वितीय क्रमांक – प्रीती पांडुरंग माने, माध्यमिक विद्यालय, पिसावरे, भोर
३. तृतीय क्रमांक – सोहम प्रशांत रोटे, श्री दादा महाराज नाटेकर विद्यालय, चिखली व प्रज्ञा दत्ता गवंडगावे, शिक्षण प्रसारक मंडळी, मराठी माध्यम विद्यालय, निगडी













