- चिंचवडमध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत सात टक्के मतदान..
- हरित मतदान केंद्र घेतात मतदारांचे लक्ष वेधून…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०२४) :- आज, बुधवारी (दि.२०) सकाळी सातपासून मतदानाला प्रारंभ झाला आहे. सायंकाळी सहापर्यंत केंद्रावर रांगेत उपस्थित असलेल्या सर्व मतदारांचे मतदान होईपर्यंत तेथे मतदान घेतले जाणार आहे. यासाठी शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी व लगतच्या मावळ विधानसभा मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. महापालिकेच्या वतीने शहरत हरित मतदान केंद्रे स्थापित करण्यात आली असून ते मतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. याठिकाणी मतदारांना तुळस, विविध प्रजातीचे फळ व फुल झाडे वाटप करण्यात येणार आहे.

२०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघात दिव्यांग महिला मतदाराने बजावला मतदानाचा हक्क…
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी, तसेच मावळ विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान केंद्रांची तयारी झाली आहे. मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंगळवारी (दि.१९) सकाळी आठपासून साहित्य वाटप करण्यात आले. कर्मचाऱ्यांचे पथक बस व इतर वाहनांनी मतदान केंद्रावर दुपारपर्यंत पोहोचले. त्यानंतर केंद्र तयार करण्यात आले.
निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे. मतदान केंद्रांवर मंडप, सीसीटीव्ही कॅमेरे, टेबल व खुर्चा लावण्यात आल्या आहेत. दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रकाश व्यवस्था आणि पंख्यांची व्यवस्था केली आहे. सावलीसाठी केंद्राबाहेर मंडप उभारण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना मंगळवारी संबंधित केंद्रांवर साहित्य वाटप केले. त्यासाठी पिशवी तयार करण्यात आली आहे. त्यात ईव्हीएम, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅटसह स्टेशनरी व आवश्यक साहित्य असते.
एका केंद्रावर एक सेक्टर ऑफिसर, तीन कर्मचारी, एक शिपाई व एक पोलिस कॉन्स्टेबल असणार आहेत. बाराशेपेक्षा अधिक मतदार असलेल्या केंद्रावर अतिरिक्त पोलिस कॉन्स्टेबल ठेवण्यात येणार आहे. असे प्रत्येक केंद्रासाठी सहा जणांचे पथक काम करणार आहे.
सकाळी सातपासून मतदान होणार सुरू मतदानासाठी निवडणूक विभागाने दिलेल्या ओळखपत्रासह आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बैंक पासबुक, शासकीय ओळखपत्र यापैकी एक पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे. मतदान केंद्राच्या परिसरामध्ये मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच मतदार केंद्रापासून शंभर मीटर परिसरातील दुकाने बंद राहणार आहेत.
सर्व मतदान केंद्रावर मतदारांसाठी सेल्फी पॉईंटची सुविधा आहे. तसेच मतदारराजाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृती करण्यात आली आहे. तसेच मतदारांसाठी मतदान केंद्रावर सर्व सोयी-सुविधा आहेत.
२०५-चिंचवड विधानसभा मतदारसंघ…
सकाळी ९ वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान
पुरुष :- २७१६४
स्त्री :- १७९७४
इतर :-००
एकूण :-४५१३८
टक्केवारी :-६.८०

















