- उमेदवार, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, सेलिब्रिटी, खेळाडू आदींचा समावेश…
- चिंचवड मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४० टक्के मतदान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील विविध मतदान केंद्रावर आज बुधवारी (दि.२०) रोजी मोठ्या संख्येने नागरिक मतदानासाठी बाहेर पडत आहेत. त्यात विविध पक्षांचे निवडणूक लढविणारे उमेदवार, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, सेलिब्रिटी, खेळाडू आदींचा समावेश आहे. कायद्याने आपल्या सर्व भारतीय नागरिकांना मतदानाचा हक्क दिला आहे. प्रत्येकाने आपला मतदानाचा पवित्र हक्क बजाविला पाहिजे. लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभाग घ्यावा. मतदानाचा हक्क बजावून लोकशाही मजबूत करावी, असे आवाहन सर्वांनी केले आहे.


चिंचवड विधानसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार शंकर जगताप आणि भोसरी विधानसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार महेश लांडगे तसेच पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनीही कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला.


महाविकास आघाडी चिंचवड विधानसभेचे उमेदवार राहुल कलाटे यांनीही आपल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी आज सकाळी महात्मा ज्योतिबा फुले शाळा, दळवीनगर, चिंचवड या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला.


शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सहकुटुंब थेरगाव येथे मतदानाचा हक्क बजाविला. थेरगाव येथील संचेती माध्यमिक विद्यालयात त्यांनी मतदान केले. विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांनी सहकुटुंब पिंपरी विधानसभेतील काळभोर नगर येथील स्वामी विवेकानंद मनपा शाळेच्या केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. आपचे नेते चेतन बेंद्रे यांनीही मतदान केले. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनीही आपल्या मतदानाचा हक्क पत्नीसह बजावला.


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पत्नी श्रीम. ईशा सिंह यांच्यासोबत आपला मताचा अधिकार बजावला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात मासुळकर कॉलनीतील एस. एस. अजमेरा शाळेत रांगेत उभे राहून त्यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे. यावेळी सर्व मतदारांनी देखील आपला मताचा हक्क बजावावा, असे आवाहन देखील त्यांनी मतदारांना केले आहे.

लोकशाही महोत्सव पर्व दिनानिमित्त आज पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, आपणही आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

भारताचे पहिले पॅरालिम्पिक पदक विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर (चंदू चॅम्पियन) यांनी आपला मताचा हक्क बजावला.
मराठी सिनेतारका सोनाली कुलकर्णी हिने ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी येथे मतदान केले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ दुपारी ३ वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान…
पुरुष :- १४५५१२
स्त्री :- १२२८०७
इतर :- ०४
एकूण :-२६८३२३
टक्केवारी :- ४०.४३

















