न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२४):- तळेगावजवळील इंदोरी बायपास या ठिकाणी असलेल्या हॉटेल जय मल्हार येथे मंगळवारी (दि. २६) रात्रीच्या सुमारास प्रसाद उर्फ किरण अशोक पवार या तरुणाचा किरकोळ वादातून खून करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद उर्फ किरण पवार (वय २७, रा. कान्हेवाडी, ता. खेड) आणि अभिषेक अशोक येवले (वय ३१, रा. कान्हेवाडी, ता. खेड) यांनी जय मल्हार हॉटेलमधील वेटरला मारहाण केली होती. यानंतर वेटरने याची माहिती हॉटेल मालक अक्षय दत्तात्रय येवले (वय ३०, रा. कान्हेवाडी, ता. खेड) यांना दिली. यानंतर हॉटेल मालक यांनी प्रसाद पवार व अभिषेक येवले यांची समजूत काढून भांडणे सोडविली होती.
मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास प्रसाद पवार व अभिषेक येवले हे कोयता घेऊन हॉटेलजवळ पुन्हा आले. त्या ठिकाणी हॉटेल मालक अक्षय येवले व त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर अक्षय येवले यांनी कोयत्याने प्रसाद पवार यांच्यावर वार केले. पोलिसांनी हॉटेल मालक अक्षय दत्तात्रय येवले यास ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलिस करीत आहेत.












