न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी(दि. ०६ डिसेंबर २०२४) :-महायुतीच्या सहा आमदारांचे विधान परिषदेमधील सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही नावाचा समावेश आहे. बावनकुळे यांच्यासह सहा आमदारांच्या नावांची सचिवालयातून अधिसूचना काढण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सहा आमदार विजयी झाल्याने त्यांना आता विधान परिषदेत जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
यामध्ये महायुतीच्या चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, आमशा पाडवी, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर या विधान परिषदेच्या आमदारांचा समावेश आहे.
भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपुरातील कामठी विधानसभेतून नेवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवल्याने ते आता विधानसभेतील आमदार बनले आहेत. त्यामुळे आता हे सहाही विधान परिषदेतील आमदार विधानसभेत जाऊन बसणार आहेत. त्यामुळे नियमानुसार, एकावेळी एका व्यक्तीस दोन्ही सभागृहाचे सदस्य होता येत नाही. त्यामुळे २३ नोव्हेंबरपासून या सर्व आमदारांचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
















