न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ डिसेंबर २०२४) :- पवना धरण परिसरात बुधवारी (दि. ४) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास नावेतून फिरण्यासाठी गेलेल्या दोन पर्यटकांचा नाव उलटल्याने मृत्यू झाला आहे. यातील एकाचा मृतदेह बुधवारी सापडला होता. तर, गुरुवारी तुषार रवींद्र अहिरे यांचा मृतदेह सापडला आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ”बालेवाडी पुणे येथील स्केन रियालिटी प्राव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीमध्ये काम करणारे सुमारे ८ मित्र पवना धरण लगत असलेल्या दुधिवरे येथे फिरण्यासाठी आले होते. यामधील काहीजण पवनाधरणाच्या पाण्यात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास नाव घेऊन पाण्यामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेले असता नाव उलट्यामुळे दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांना वाचविण्यासाठी शिवदुर्ग रेस्क्यू टिम व मावळ वन्य जीवरक्षक यांच्या वतीने शोध सुरू केल्यानंतर बुधवारी एकाचा मृतदेह मिळून आला.
त्यानंतर रात्री अंधार झाल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. गुरुवारी पुन्हा शोधकार्य सुरू केले व दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दुसरा मृतदेह मिळून आला, यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला असून, तपास लोणावळा ग्रामीणचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत आवारे, युवराज बनसोडे, सीताराम बोकड, नवनाथ चपटे, नितीन कदम हे करत आहे.
पवनाधरण परिसरात असे अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात; परंतु नाव किंवा बोटमध्ये जीवरक्षक उपकरणे नसतात. दरवर्षी पवना धरणात अशा अनेक दुर्घटना घडत असल्याचे बोलले जात आहे.
















