- या दिवशी मिळणार हमखास सुट्टी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ डिसेंबर २०२४) :- सणांपासून निवडणुकीपर्यंत सततच्या बंदोबस्तात व्यस्त असणारे पोलीस यापुढे स्वतःचा वाढदिवस हक्काची सुट्टी घेऊन कुटुंबासोबत साजरा करू शकतील. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश पोलीस ठाणे आणि पोलिसांच्या विविध शाखांना दिले आहेत.
पोलीस अधिकारी, कर्मचारी आपल्या समाजात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. समाजाच्या संरक्षणासाठी त्यांचे समर्पण अतुलनीय आहे आणि त्यांच्या अविरत प्रयत्नांमुळे समाज सुरक्षित वातावरणात राहतो. धोका स्वीकारून पोलिसांनी गुन्हेगारीपासून नागरिकांचे संरक्षण केले आहे. यामुळे पोलीस दररोज आपले धाडस सिद्ध करतात, न्याय आणि कायद्याचे पालन करण्यासाठी पोलिसांची कटिबद्धता आपल्या कुटुंबांसाठी एक ढाल ठरते, जेणेकरून आव्हानात्मक काळातही सुव्यवस्था टिकून राहते.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी त्यांच्या वाढदिवसाकरिता सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस दल हे प्रशासनिक दृष्ट्या व नागरिकांप्रती जागरूक राहून काम करीत असते. वेळप्रसंगी त्यांना वैयक्तिक कामे असतानाही ते रजेवर जाऊ शकत नाहीत. पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना दैनंदिन कामाच्या व्यापामुळे बरेचदा स्वतःचे वाढदिवस असतानाही कामाकरिता हजर होणे व आपल्या कुटुंबाला वेळ देणे शक्य होत नाही. तसेच दैनंदिन कामाच्या व्यापामुळे त्यांच्यात ताणतणाव निर्माण होऊन त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होतो. या सर्व बाबींचा विचार करून यापुढे त्यांना त्यांच्या वाढदिवसाकरिता सुट्टी देण्याचा निर्णय पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घेतला आहे.
वाढदिवसाच्या आदल्या दिवशी पूर्वसंध्येला पोलीस ठाण्यांमध्ये संबंधित वरिष्ठ अधिकारी हे पोलीस ठाण्यातील ज्यांचा वाढदिवस आहे त्या अधिकारी व कर्मचारी यांचा वाढदिवस साजरा करून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदश संबंधितांना देतील, असेही पोलीस आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
आठ वर्षांनी अमलबजावणी…
२०१६ मध्ये तत्कालीन गहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलिसांना वाढदिवसाच्या दिवशी सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय १५ ऑगस्ट २०१८ मध्ये स्थापन झाले. सुरुवातीपासूनच पोलीस आयुक्तालयात मनुष्यबळाची कमतरता होती. मात्र मागील दोन भरतीमुळे पोलिसांची संख्या वाढल्याने त्यांच्यावरील कामाचा ताण थोड्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी सुट्टी देण्याचा निर्णय पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घेतला आहे.
















