- शहराची हवा बनली आहे अत्यंत खराब…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ डिसेंबर २०२४) :- दिल्ली, मुंबई आणि पुण्यापाठोपाठ आता औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवड हे हवेच्या खराब गुणवत्तेत सामील झाले आहे. शहरातील हवेच्या गुणवत्तेची पातळी ही ० ते ५० असायला पाहिजे. पण ती ३०० पार गेली आहे. थंडी असल्याने पेटणाऱ्या शेकोट्या आणि शहरी भागात सरपण जाळून बनवले जाणारे जेवण, बेकरी आणि लाकडावर होणारे अंत्यसंस्कार हवा प्रदूषणात भर टाकत आहेत.
आता पिंपरी चिंचवडचा विचार करता खराब रस्ते, बांधकाम, औद्योगिक आणि शहरी कचरा जाळण्याचे प्रकार व त्यातच कमी झालेले हरित क्षेत्र व ढासळलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पिंपरी चिंचवडकरांचा श्वास कोंडत आहे. हिवाळा सुरू झाल्याने थंडी वाढू लागली आहे. शहरावर धुक्याची दाट झालर पसरली जात आहे. त्यात शहरातील काही भागात प्रदूषणामुळे पिंपरी-चिंचवडची हवा खराबी श्रेणीत गेल्याचे दिसून येत आहे. भोसरी, थेरगाव, पिंपरीसारख्या भागात सकाळी हवा गुणवत्ता निर्देशांक २००-२५० पेक्षा अधिक नोंदविला जात आहे. मात्र, हवा शुध्द करण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असतात. त्या यंत्रणा देखील फोल ठरू लागल्याचे दिसून येत आहे.
हवा गुणवत्ता निर्देशांक ५० पर्यंत असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा अधिक प्रदूषण वाढल्यास त्याचे आरोग्यावर परिणाम होतात. शहरातील काही भागात मागील काही दिवसांत सकाळी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३०० च्या पुढे नोंदवला गेला. यामध्ये भोसरीतील इंद्रायणीनगर येथे ३००, मोशी परिसरात ३२५, चिखली परिसरात ३६० आणि भोसरी ते हिंजवडी परिसरात ३०० च्या पुढे नोंदविली गेली आहे. खराब श्रेणीत पोहोचलेली शहराची हवा शहरवासीयांच्या आरोग्यावर परिणामकारक ठरत आहे. त्यातून श्वसनविकाराचा धोका वाढत आहे. तसेच, अस्थमा, सीओपीडी, इतर फुप्फुसांच्या विकार असलेल्या रुग्णांना याचा मोठा त्रास होतो. पर्यावरण प्रेमींकडून हवा प्रदूषण कमी करण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरत असून केलेल्या उपाययोजना नावालाच असल्याचा आरोप होत आहे.
















