- हप्त्यात भरता येतेय विजेचे बिल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ डिसेंबर २०२४) :- बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजनेला ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या योजनेंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.
राज्यातील महावितरणच्या ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या (पीडी) ग्राहकांसाठी १ सप्टेंबरपासून अभय योजना सुरू केली होती. योजनेचा कालावधी ३० नोव्हेंबर रोजी संपली असून, योजनेस एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे योजनेत अजूनही सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. पुणे परिमंडळात ५८९३ वीज ग्राहकांनी आतापर्यंत योजनेचा लाभ घेतला.
रक्कम ६ हप्त्यांत भरायची सवलत…
अभय योजनेत मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यांत भरायची सवलत आहे. जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एकरकमी थकीत बिल भरतील, त्यांना दहा टक्के, तर उच्चदाब ग्राहकांना पाच टक्के सवलत आहे, ऑनलाइन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणच्या मोबाइल अॅपवरून योजनेचा लाभ घेता येईल.
















